चौथे सहदिवाणी न्यायाधीशांचा न्यायालयीन कक्ष सील
By Admin | Updated: June 6, 2017 00:07 IST2017-06-06T00:07:19+5:302017-06-06T00:07:19+5:30
न्यायालयातील आगीच्या घटनेमुळे ४ थे सहदिवाणी न्यायाधीश यांचे न्यायालयीन कक्ष सील करण्यात आले.

चौथे सहदिवाणी न्यायाधीशांचा न्यायालयीन कक्ष सील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : न्यायालयातील आगीच्या घटनेमुळे ४ थे सहदिवाणी न्यायाधीश यांचे न्यायालयीन कक्ष सील करण्यात आले. पोलीस चौकशी, प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेची तपासणी व वीज वितरणाच्या अहवालातून आगीचे कारण स्पष्ट झाल्यावर सील उघडले जाणार असल्याची माहिती विधी सूत्रांनी दिली.
या आगीत न्यायालयीन कक्षातील कोणकोणती दस्तऐवज जळालीत, हे तपासून पाहिले जाणार आहे. रविवारी सकाळी लागलेल्या आगीत ४ थे सहदिवाणी न्यायाधीश यांचे न्यायालयीन कक्षासह त्यांच्या वैयक्तिक कक्षातील काही साहित्य व काही दस्तऐवज जळाली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या चमुने आगीचे निश्चित कारण शोधून काढण्यासाठी तेथील आवश्यक ते नमुने घेतले. प्रभारी मुख्य न्यायाधीश ज्ञा.वा.मोडक यांच्यासह ४ थे सहदिवाणी न्यायाधीश (क-स्तर) राठोड यांनी न्यायालयात जाऊन पाहणी करून घटनेची माहिती उच्च न्यायालयाला कळविली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी न्यायाधीशांच्या न्यायालयीन कक्षाला सील लावण्यात आले.