मतमोजणी; प्रशासन सज्ज

By Admin | Updated: October 18, 2014 22:56 IST2014-10-18T22:56:58+5:302014-10-18T22:56:58+5:30

राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण निकाल लावण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.

Counting; Admin ready | मतमोजणी; प्रशासन सज्ज

मतमोजणी; प्रशासन सज्ज

अमरावती : राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण निकाल लावण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. अमरावती जिल्ह्यात १४ लाख, २२ हजार, ८५७ मतदारांनी मतदान केले असून आठही मतदारसंघांतील १३५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला निश्चित केला जाईल. ११२ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
बुधवार १५ आॅक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर कोण विजयी होणार, या चर्चांनी मागील चार दिवस घालविले. मैदानात असलेल्या उमेदवारांची गर्दी बघता कोणीही उमेदवार ठामपणे विजयाचे दावे करु शकले नाही. मात्र मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला, हे रविवार १९ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. मतदानानंतर पक्षनिहाय अंदाज किंवा गुप्तचर यंत्रणेने वर्तविलेले अहवाल किती खरे ठरतात, हे दिसून येईल. मतमोजणीची प्रक्रिया त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अमरावती, बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी ही येथील विलासनगर भागातील शाासकीय वेअर हाऊसमध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने शनिवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी स्ट्राँग रुम परिसराची पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, बी.के. गावराने, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, ठाणेदार गणेश अणे, जिल्हा माहिती अधिकारी काचावार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनी मतमोजणीबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उमेदवारांचे प्रतिनिधी, मीडिया केंद्र, कॅन्टीन, निवडणूक निरीक्षक, अधिकारी कक्ष आदींसाठी विविध व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतदानस्थळांव्यतिरिक्त शहरातील काही संवेदनशील भागात अतिरिक्त कुमक तैनात केली जाणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना सकाळी सात वाजता मतमोजणीस्थळी पोहचणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी १५० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरु होईल. पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय ईव्हीएमची अंतिम फेरीची मतमोजणी पूर्ण केली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतमोजणी सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Counting; Admin ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.