अध्यक्षपदाचे काऊंटडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:28+5:30
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसीकरिता राखीव आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद पटकाविण्यासाठी २९ सदस्यसंख्या आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ पैकी २ व शिवसेनेचे ३ असे एकूण ३१ सदस्य आहेत.

अध्यक्षपदाचे काऊंटडाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यमंत्र्याचा दर्जा लाभलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपली आहे. ६ जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाआघाडी सज्ज आहे, तर विरोधी पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला राजकीय आकडेमोड साध्य करता आली नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीकडे राहील, असे चित्र सद्यस्थितीत आहे. ५७ सदस्यीय जिल्हा परिषदे मध्ये भाजपचे १३ सदस्य असल्याने ते सत्तेसमीकरण जुळवू शकत नसल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसीकरिता राखीव आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद पटकाविण्यासाठी २९ सदस्यसंख्या आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ पैकी २ व शिवसेनेचे ३ असे एकूण ३१ सदस्य आहेत.
भाजपचे १३, प्रहार ५, युवा स्वाभिमान २, तर बसप, लढा व अपक्ष प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल विरोधकांकडे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे ३१ सदस्य वगळता राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकुमार पटेल गटाचे तीन सदस्यसुद्धा यावेळी महाविकास आघाडीसोबत गेल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सदस्यसंख्या ३४ वर पोहोचली आहे. भाजप व अन्य सहकारी २३ या सदस्यसंख्येवरच स्थिरावतात.
मागील अडीच वर्षांतसुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदाला शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोघांनी टेकू दिला होता. उपाध्यक्षपद पदरात शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. ६ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडीदरम्यानही मागील कित्ता गिरविला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या पुढील कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक ही आता केवळ २४ तासांवर आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदेची सत्ता सद्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. ही सत्ता उर्वरित कालावधीसाठी कायम ठेवण्याकरिता महाविकास आघाडीचे नेते जोमाने कामाला लागले आहेत. सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या मॅजिक फिगरच्या पलीकडे महाविकास आघाडीने संख्याबळ जुळविले आहे. सत्तास्थापनेकरिता लागणारी मॅजिक फिगर जुळत नसल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या गोटात शांतता असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसकडे अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत.
सत्ताधाऱ्यांचे पर्यटन
जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीने सत्तास्थापनेवर सदस्यसंख्येच्या बळावर प्रबळ दावेदारी ठोकली आहे. असे असले तरी यामध्ये कुठेही दगाबाजी होऊ नये, याकरिता महाआघाडीत सर्व सदस्य ताडोबा येथे पर्यटनवारी शुक्रवारी रवाना करण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजप व अन्य सहकारी पक्षांचे सदस्य आपआपल्या सर्कलमध्ये असल्याचे माहिती आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत उमेदवारी अर्जाची उचल करता येईल व परिपूर्ण अर्ज दाखल करता येणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दुपारी ३ वाजता विशेष सभेचे कामकाज सुरू होणार आहे. ३.१५ वाजेपर्यंत अर्जाची छाननी व वैध अर्ज असलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविली जाणार आहेत. त्यानंतर लगेच उमेदवारी अर्जाची माघार व आवश्यकता असल्यास पहिल्यांदा अध्यक्षपदाकरिता मतदान व त्यानंतर लगेच उपाध्यक्षपदाकरिता मतदान होणार आहे. अमरावतीचे उपविभागीय अधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज हाताळतील.