Coronavirus in Amravati; मेळघाटात कहर; कोरकू भाषेतून लसीकरणाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 16:40 IST2021-05-06T16:40:29+5:302021-05-06T16:40:49+5:30
Coronavirus in Amravati चिखलदरा तालुक्यामध्ये आतापर्यंत ६६८३ अन्टीजेन तसेच ३३२७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६८३ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.

Coronavirus in Amravati; मेळघाटात कहर; कोरकू भाषेतून लसीकरणाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावी: चिखलदरा तालुक्यामध्ये आतापर्यंत ६६८३ अन्टीजेन तसेच ३३२७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६८३ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. तालुक्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व चिखलदरा व चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण केंद्र उपलब्धतेनुसार सुरु करण्यात आले आहे.
तालुक्यात विनामास्क, मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी व सोशल डिस्टंसिंग भंग केल्याप्रकरणी १४ लोकांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासणीसाठी सेमाडोह, बिहाली, चिखलदरा, डोमा येथे या चार नाक्यांवर आरोग्य विभागाची पथके नेमण्यात आली. डोमा येथे आतंर राज्य सीमेवर पोलीस बंदोबस्तात येणा?्या-जाणा?्या लोकांवर नजर ठेवून तपासण्या करण्यात येत आहेत. गावोगावी आरटीपीसीआर तपासणीचे कॅम्प लावण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी लोकमतशी बोलताना दिली.
शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना टेस्टिंग
टेंब्रुसोडा, चिखली, चिखलदरा व डोमा या ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. चिखलदरा व चुरणी या ठिकाणी कोविड समर्पित रुग्णालयांची स्थापना करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आमदार निधी व इतर सामाजिक संस्थांचा हातभार लागला आहे.
प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरकू भाषेतून संवाद
तालुक्यातील दुर्गम भागात कोरकू भाषेत कोरोना संबंधी जनजागृती तसेच लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आदिवासींमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन आता गावागावांत जाऊन जनजागृती करीत असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. रुग्णांसाठी हेल्पलाईन उघडण्यात आल्या आहेत. गृह विलगीकरण असलेल्या नागरिकांशी आरोग्यविषयक संवाद साधण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.