२० अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजवून दिली सहकाऱ्याला अनोखी श्रद्धांजली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 08:47 IST2021-05-20T05:00:00+5:302021-05-20T08:47:07+5:30

कोरोना रुग्णांची ने-आण करताना रुग्णवाहिकाचालक संजय पुनसे यांना अगोदर सारीने ग्रासले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ मे रोजी त्यांना भरती करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची लागण झाली. मात्र, १९ मे रोजी रात्री १ वाजता ते दगावले.आपला सहकारी गेल्याचे अतीव दु:ख अन्य खासगी रुग्णवाहिका चालकांना झाले. रुग्णवाहिका चालक संघटनेच्यावतीने पुनसे यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेण्यात आला.

Corona kills ambulance driver, siren blows a unique tribute | २० अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजवून दिली सहकाऱ्याला अनोखी श्रद्धांजली...

२० अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजवून दिली सहकाऱ्याला अनोखी श्रद्धांजली...

ठळक मुद्देइर्विन ते हिंदू स्मशानभूमी दरम्यान १७ ते २० रुग्णवाहिकांचा होता समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी रुग्णवाहिका चालक संजय पुनसे (४५, रा. संजय गांधीनगर) यांचा बुधवारी कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. ही बाब शहरातील रुग्णवाहिका चालकांसाठी धक्कादायक ठरली. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह ते हिंदू स्मशानभूमीपर्यंत सायरन वाजवत रांंगेत १७ ते २० रुग्णवाहिका नेऊन सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभाग दर्शविला व अनोखी श्रद्धांजली वाहिली. मात्र, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका जात असल्याचे बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

कोरोना रुग्णांची ने-आण करताना रुग्णवाहिकाचालक संजय पुनसे यांना अगोदर सारीने ग्रासले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ मे रोजी त्यांना भरती करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची लागण झाली. मात्र, १९ मे रोजी रात्री १ वाजता ते दगावले. त्यांचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. आपला सहकारी गेल्याचे अतीव दु:ख अन्य खासगी रुग्णवाहिका चालकांना झाले. रुग्णवाहिका चालक संघटनेच्यावतीने पुनसे यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सायरनचा जोरदार आवाज करीत रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भुतेश्वर चौक येथून हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या.  

दरम्यान, एकाच वेळी सुमारे १७ ते २० रूग्णवाहिका हिंदू स्मशानच्या दिशेने जात असल्याचे बघून बुधवारी कोरोना मृत्यूचा स्फोट तर झाला नाही, अशी भीती नागरिकांना झाली होती. मात्र, चालकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सहकारी चालकांनी सायरन वाजवत रिकाम्या रुग्णवाहिका आणल्यात, अशी माहिती मिळताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  

संजय पुनसे यांना सारी आजाराने ग्रासल्याने इर्विनध्ये ९ मे रोजी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोरोना चाचणी करण्यात आली. १९ मेच्या रात्री १ वाजता त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आला.
- निरंजन खंडारे 
सहसचिव, रुग्णवाहिका संघटना

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. मात्र, रुग्णवाहिका चालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सायरन वाजवीत हिंदू स्मशानभूमीपर्यंत नेल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्याअनुषंगाने चालक हुडकून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- राहुल आठवले 
पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली 

 

Web Title: Corona kills ambulance driver, siren blows a unique tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.