कोरोनाने दुरावली रक्ताच्या नात्याची माणसे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:18+5:302021-05-05T04:21:18+5:30
जिल्ह्यात ६८५ जणांचा बळी, स्वतंत्र अंत्यसंस्काराची व्यवस्था अमरावती : कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यास प्रिय, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाही अंत्यसंस्काराला उभे ...

कोरोनाने दुरावली रक्ताच्या नात्याची माणसे!
जिल्ह्यात ६८५ जणांचा बळी, स्वतंत्र अंत्यसंस्काराची व्यवस्था
अमरावती : कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यास प्रिय, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाही अंत्यसंस्काराला उभे राहता येत नाही. अंतिमसमयी ती दुरावतात. अशा कोरोना संक्रमितांच्या अंत्यसंस्कारासाठी हिंदू स्मशानभूमितील कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. वर्षभरात कोरोनाने दगावलेल्या तब्बल ६८५ मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
कोरोनाच्या कहराला मार्च महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात जवळपास ५१ हजार १०० जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी यात कोरोनावर ४७ हजार ५१७ जणांनी या संसर्गावर मात केली आहे. कोरोनामुळेच मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे नगण्य आहे. अन्य आजार बळावल्यानेदेखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात प्रामुख्याने उच्च रक्तचाप, मधुमेह ही कारणे आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर अनेक नातेवाईक स्मशानभूमीच्या दाराशी हजर होतात; परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी बाहेरच थांबून ते आम्हाला अंत्यसंस्कार करण्यास सांगत असल्याचे स्मशानभूमीचे कर्मचारी सांगतात. अंतिमसमयी मृतदेहाच्या तोंडात आम्हाला पाणी टाकावे लागते. दररोज मृतदेहाचा वाढता आकडा पाहून मनाची घालमेल होते, असे सांगताना या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
------
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू ६८५
हिंदू स्मशानभूमीत केलेले अंत्यविधी : ६३०
९२ टक्के स्मशानभूमी कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
-------------
बॉक्स
पाच माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही
गत काही महिन्यांत अमरावतीतील कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. वर्षभरात ६८५ पेक्षा अधिक मृतदेहांवर अमरावती पालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले. यावेळी ५०० पेक्षा अधिक नातेवाइकांनी मृतदेहाला पाणी पाजण्यासाठीदेखील पुढे येण्यास नकार दिला. त्यामुळे अशा मृतदेहांवर आम्हीच शक्य तेवढे रीतीरिवाज पाळून अंत्यसंस्कार केले आहेत. अनेक जण अंत्यसंस्कार होईपर्यंत थांबत असले तरी स्मशानभूमीपासून शंभर फूट दूर राहूनच मृतदेहाचे अंत्यदर्शन घेत असल्याचे दिसून आले.
बॉक्स
ग्रामीण भागात मृत्यू वाढले
अमरावती जिल्ह्यात मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. जवळपास आतापर्यंत कोरोनाने १००२ मृत्यू झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत अचलपूर, वरूड, मोर्शी, धामणगाव रेल्वे कोरोनाचा हाॅटस्पॉट झाला आहे.
कोट
वर्षभरापासून आम्ही १८ जण कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करीत होतो; परंतु गेल्या दोन महिन्यांत अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील विलास नगर, शंकर नगर, एसआरपीएफ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी १२ माणसे अतिरिक्त दिली आहेत. त्यामुळे आमच्यावरील ताण हलका झाला आहे.
- एकनाथ इंगळे, प्रबंधक, हिंदू स्मशानभूमी
कोट
कोरोना मृतांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश आहे. त्यामुळे कधी दफन, तर कधी दाह संस्कार करावे लागतात. अनेक मृतांचे नातेवाईक दुरून शोक व्यक्त करतात, तर काहींचे नातेवाईक अंत्यविधीलाही येत नाहीत. त्यावेळी आम्ही स्वत:च विधी उरकतो.
- किसन लांडगे, कर्मचारी हिंदू स्मशानभूमी.