कोरोनानंतर बदलले घराघरांतील किचन; हेल्दी पदार्थ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:22+5:302021-06-17T04:10:22+5:30
कोरोनानंतर घराघरांत आपल्या कुटुंबीयांचे स्वास्थ्य सुदृढ कसे राहील, यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी महिलांनी त्यांच्या किचनमध्ये कडधान्य, ...

कोरोनानंतर बदलले घराघरांतील किचन; हेल्दी पदार्थ वाढले
कोरोनानंतर घराघरांत आपल्या कुटुंबीयांचे स्वास्थ्य सुदृढ कसे राहील, यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी महिलांनी त्यांच्या किचनमध्ये कडधान्य, पालेभाज्या, सूप यासारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर वाढविला आहे. गेल्या सव्वा वर्षांपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यावर जोर दिला जात आहे.
कोरोनानंतर प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल केलेला आहे. जास्तीत जास्त हलके व प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थ खाण्यावर भर दिला जात आहे. आधी याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. कुटुंबातील सर्वच आपली प्रतिकारशक्ती कशी वाढेल, यावर भर देताना दिसून पडत आहे. हिरव्या पालेभाज्या, सूप, फळे यासह शरीर सुदृढ ठेवण्यासाठी इतरही पौष्टिक आहारावर अधिक भर दिला जात आहे. महिलांनी सकाळच्या नाष्ट्यामध्ये जास्तीत जास्त कडधान्याचा वापर करणे सुरू केले आहे. सूपचा वापरदेखील बऱ्याच घरांमध्ये वाढला आहे. फळेदेखील मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जात आहेत. कोरोनाआधी प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर फारसा भर दिला जात नव्हता. आता नाष्टा तसेच जेवणामधून जास्तीत जास्त प्रोटीन कसे मिळेल, याकडे घराघरांतील महिलांचा जोर आहे. यामुळे किचनचे रूपडेच बदलले आहे. कोरोनाकाळात विविध चवदार, मात्र शरीराचे पोषण, प्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थ शिकण्याकडे वळल्याचे काही महिलांनी सांगितले.
–----------------------------------
बॉक्स : जंक फूडला रामराम
बहुतांश लोकांनी डबाबंद पॅकेटमधील तसेच बराच वेळापासून बनवून ठेवलेले खाद्यपदार्थ कोरोनाच्या काळात वर्ज्य केले. जास्तीत जास्त ताजे, प्रोटीनयुक्त आहारावर भर दिसून येतो. पोटाला त्रासदायक ठरेल असे जंकफूड टाळले जात आहे. वेगवेगळे पदार्थ घरीच बनवून खाण्याला घरोघरी पसंती असल्याचे या काळातील चित्र आहे.
----------------------------
बॉक्स:
फास्टफूडवर अघोषित बंदीच
तरुण फास्टफूडवर तुटून पडतात. विविध आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी घरातील जबाबदार व्यक्तींनी कोरोनाकाळात शरीराला त्रासदायक ठरणारे खाद्यपदार्थ खाण्यात येऊ नये, यावर भर दिला. सरबरीत पदार्थ घरीच बनविले जात आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट ,खाद्यपदार्थांच्या हातगाड्या बंदच असल्याचा चांगला परिणाम आरोग्यावर झाला आहे.
-----------------------------
कोट-
नियमित व्यायाम केला पाहिजे, तणावमुक्त असणे गरजेचे आहे. सहा ते सात तास झोप झाली पाहिजे. कडधान्य, दुधाचे पदार्थ, फळे, हिरव्या पालेभाज्या यांसह व्हिटॅमिन्स ज्यातून मिळेल, ते खाल्ले पाहिजे, ज्यामुळे प्रतिकारशक्ती बळकट राहून शरीर सुदृढ राहील.
- रसिका राजनेकर, आहारतज्ज्ञ, रिम्स हॉस्पिटल, अमरावती.
----------------------------------
*गृहिणी म्हणतात
प्रतिक्रिया-
1) कोरोना संसर्गपासून आम्ही जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांवर भर देतो आहे. कडधान्य खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते, असा सल्ला डॉक्टरांसह आहारतज्ज्ञ देत आहेत. आमच्या किचनमध्ये त्याचा अधिक वापर करतो आहे.
- मनीषा संदीप अंबाडकर, गृहिणी.
२) ज्यामध्ये प्रोटीन अधिक आहे, असे खाद्यपदार्थ तयार करण्यावर माझा अधिक भर असतो. कोरोनाच्या काळात बरेच काही शिकायला मिळाले. सूप, फळांचा वापर वाढविला आहे.
- सारिका देवेंद्र जोशी, गृहिणी
3) कोरोनापासून अधिक प्रमाणात फळे, पालेभाज्या, कडधान्य, दुधापासून बनणारे पदार्थ याचा वापर वाढला आहे. कुटुंबाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यावर माझा अधिक भर असतो.
- वैशाली श्याम नागपुरे, गृहिणी.