कोराना इफेक्ट; ट्रान्सस्क्रिप्टची मागणी मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 20:35 IST2020-06-24T20:33:27+5:302020-06-24T20:35:17+5:30
२१ मार्च ते २४ जून या तीन महिन्यांत लॉकडाऊनमध्ये केवळ १० ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविले आहेत. त्यामुळे यंदा विदेशात उच्च शिक्षण आणि व्हिसा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी धावपळ दिसून येत नाही.

कोराना इफेक्ट; ट्रान्सस्क्रिप्टची मागणी मंदावली
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदेशात शिक्षणासाठी अथवा व्हिसा मिळवायचा असल्यास ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून २१ मार्च ते २४ जून २०२० या लॉकडाऊनच्या काळात केवळ १० विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र घेतले आहेत. कोरोनामुळे या प्रमाणपत्राची मागणी मंदावली असून, विदेशात शिक्षण नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर आली आहे.
अमरावती विद्यापीठातून सन २०१९ मध्ये ७६७ विद्यार्थ्यांनी ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र घेतल्याची नोंद आहे. हे प्रमाणपत्र विदेशातील नामांकित संस्था, विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असते. ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र थेट विद्यार्थ्यांच्या हाती दिले जात नाही. त्याकरिता विदेशातील कंपनी, संस्था यांचे ना-हरकत पत्र असल्यास विद्यापीठातून ते थेट त्यांच्याकडेच पाठविले जाते. जानेवारी ते २० मार्च २०२० यादरम्यान तीन महिन्यांत १७७ ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. परंतु, २१ मार्च ते २४ जून या तीन महिन्यांत लॉकडाऊनमध्ये केवळ १० ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र पाठविले आहेत. त्यामुळे यंदा विदेशात उच्च शिक्षण आणि व्हिसा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी धावपळ दिसून येत नाही. अमरावती विद्यापीठातून ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्रासाठी कॅनडा येथील वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेसकरिता सर्वाधिक मागणी राहते, असे आकडेवारीहून स्पष्ट होते.
गतवर्षी वाटप झालेली संख्या
अमरावती विद्यापीठातून सन २०१९ मध्ये ७६७ ट्रॉन्सस्किप्ट प्रमाणपत्र देण्यात आले. यात जानेवारीत ७५, फेब्रुवारीत ६९, मार्चमध्ये ६९, एप्रिलमध्ये ३१, मे मध्ये ६५, जूनमध्ये -५०, जुलैत ५६, ऑगस्टमध्ये ६२, सप्टेंबरमध्ये ६४, ऑक्टोबरमध्ये ५७, नोव्हेंबरमध्ये ६६, डिसेंबरमध्ये ९० प्रमाणपत्र विद्यापीठातून विदेशातील विविध कंपनी, शैक्षणिक संस्था, विद्यापीठांना पाठविले आहे.
ट्रान्सस्क्रिप्ट प्रमाणपत्र हे विदेशात शैक्षणिक संस्था, व्हिसा, विद्यापीठ अथवा कंपनीच्या पत्रानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या नावे पाठविले जाते. हे प्रमाणपत्र अतिशय गोपनीय राहत असून, ते सीलबंद पाठविण्याची प्रक्रिया विद्यापीठ करते. हल्ली कोरोनामुळे या प्रमाणपत्रासाठी अर्ज नगण्य येत आहे. मागणी मंदावली आहे.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ