अवैध सावकारावर सहकार विभागाची धाड; वेणी गणेशपूर येथील घटना
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 15, 2024 19:56 IST2024-07-15T19:55:15+5:302024-07-15T19:56:36+5:30
कोरे धनादेश, मुद्रांक, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

अवैध सावकारावर सहकार विभागाची धाड; वेणी गणेशपूर येथील घटना
अमरावती : अवैध सावकारीच्या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर येथील दिलीप जयस्वाल व रोहित जयस्वाल यांच्या घरी धाड मारली. येथून आक्षपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर आदी जप्त करण्यात आले. मक्त्याने दिलेल्या शेतीचा ताबा देत नसल्याने अवैध सावकारीची माहिती तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधकांकडे दिली होती.
याची शहानिशा व पडताळणी करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी सहायक निबंधक सचिन पतंगे यांना दिले. त्यानुसार ही धाड टाकण्यात आली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार तक्रारीची कारवाई करण्यात आली. या कारवाईत गजानन वडेकर, अमोल लोमटे, आशिष भांडे, उज्ज्वला मोहोड, वसंता शेळके, शुभांगी नंदेश्वर यांच्यासह पोलिस पथकाने सहभाग घेतला.