लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाची आर्थिक फसवणूक व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी अखेर चौकशीच्या २४ व्या दिवशी 'फ्रॉड' डीआरटीओ राज बागरी याला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्याने शुक्रवारी त्याची येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बागरीच्या न झालेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी लागलीच त्याला १८ मार्च रोजी नागपुरातून ताब्यात घेतले होते. मात्र अनेकदा चौकशीस बोलावल्यानंतर त्याला अटक केली नव्हती. अखेर त्याला गुरुवारी अटक करण्यात आली.
आरोपी राज बागरी याच्या सहा ते सात वेळा केलेल्या चौकशीदरम्यान व त्याच्या जबाबातून पोलिसांना ठोस असे काही निष्पन्न न झाल्याने अखेर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार ब्रह्म गिरी यांनी दिली. अटकेनंतर लगेचच त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडीही सुनावली. मात्र, शुक्रवारी न्यायालयाने त्याचा जामीन नाकारून त्याची रवानगी कारागृहात केल्याचेही गिरी म्हणाले.
या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक समाधान वाठोरे यांनी वारंवार त्याचे जबाब नोंदविले होते. मात्र ताब्यात घेतल्याच्या तब्बल २४व्या दिवशी ते राज बागरीच्या अटकेच्या निष्कर्षाप्रत पोहोचले. तपासाच्या संथगतीबाबत पोलिस उपायुक्त समाधान वाठोरे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तर, १८ मार्च रोजी ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक का केली नाही, अशा शब्दांत सीपींनीही संबंधित अधिकाऱ्यांची कानटोचणी केली होती.
असे आहे प्रकरण ...
- गाडगेनगर पोलिसांनी २३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५:१८ च्या सुमारास येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार वर्धेकर (बागडी) ऊर्फ राज बागरीविरुद्ध एफआयआर नोंदविला होता.
- तब्बल साडेसहा महिन्यांनंतर आमदार विजय वडेट्टीवार यांच्या दणक्याने गाडगेनगर पोलिसांना १८ मार्च २०२५ रोजी त्याचे लोकेशन मिळाले. मात्र, तो हाती सापडल्यानंतरही केवळ चौकशीचा फार्स केला जात होता.
- 'लोकमत'ने ती लेटलतिफी 3 उचलून धरल्यानंतर अखेर त्याला अटक करण्यात आली.
- सेवापुस्तिकेत नोंद जन्मतारखेत खाडाखोड करून दोन वर्षे अधिक सेवा उपभोगून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप राज बागरीवर आहे.
"आरोपी राज बागरी याला गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला. त्याला न्यायालयीन कोठडीअन्वये जिल्हा मध्यवर्ती कारागृहात धाडण्यात आले. तपास योग्य दिशेने सुरू आहे."- ब्रम्ह गिरी, ठाणेदार, गाडगेनगर