शस्त्राच्या धाकावर कंटेनरचालकाला लुटले
By Admin | Updated: August 26, 2016 00:11 IST2016-08-26T00:11:08+5:302016-08-26T00:11:08+5:30
पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरचालकाला अडवून शस्त्राच्या धाकावर लुटल्याची घटना नजीकच्या पिंपळविहीर येथे बुधवारी रात्री घडली.

शस्त्राच्या धाकावर कंटेनरचालकाला लुटले
पिंपळविहीर येथील घटना : महिलांचाही समावेश
नांदगावपेठ : पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरचालकाला अडवून शस्त्राच्या धाकावर लुटल्याची घटना नजीकच्या पिंपळविहीर येथे बुधवारी रात्री घडली. कंटेनरचालकाला लूटणाऱ्या टोळीत दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून यातील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, पुणे येथील विष्णुकांत शिवाजी पवार हा कंटेनर घेऊन नागपूरकडे जात असताना बुधवारी रात्री पिंपळविहीरनजीक दोन महिलांनी हात दाखविला. पवार यांनी वाहन थांबविले असता महिलांसह दोन पुरूषांनी वाहनात प्रवेश केला व शस्त्राच्या धाकावर त्यांचे पैशांचे पाकिट घेऊन चौघेही फरार झालेत. झटापटीत चालक विष्णुकांत पवार यांच्या मानेला व हाताला दुखापत झाली. लगेच त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीएसआय मानेकर यांनी तातडीने तपास करून आरोपी नीलेश हरिदास मकेश्वर (रा.जळका हिरापूर) याला अटक केली असून तपास सुरू आहे.