शीतपेय विक्रेते करतात नियमांचे उल्लंघन
By Admin | Updated: February 22, 2017 00:17 IST2017-02-22T00:17:24+5:302017-02-22T00:17:24+5:30
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याची झळही अमरावतीकरांना पोहोचत आहे.

शीतपेय विक्रेते करतात नियमांचे उल्लंघन
एफडीएचे दुर्लक्ष : पाणी नमुने तपासावे
अमरावती : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याची झळही अमरावतीकरांना पोहोचत आहे. रात्री थंडी, तर दिवसा ऊन असे दुहेरी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे परप्रांतीय शीतपेय विक्रेत्यांनी अंबानगरीतील मुख्य चौकात आपली दुकाने थाटली आहेत. परंतु सदर शीतपेय विक्रेते कुठलाही नियम पाळत नाहीत. अनेक शीतपेय विक्रेत्यांनी एफडीएकडे नोंदणीच केली नसल्याची बाब पुढे आली आहे. नियमाने या ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी देताना ते पाणी नमुने जिल्हा प्रयोगशाळेत तपासलेले असावे, पण कुठलाही नियम न पाळता नागरिकांना दूषित पाणी पाजण्याचा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
विषाणु संसर्गामुळे शहरात अनेक आजार होत असून अन्न व प्रशासन विभागाने अशा शीतपेय विक्रेत्यांकडून पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविल्यास त्यातील सत्य बाहेर येईल. त्यामुळे अशा नियमबाह्य वागणाऱ्या ज्यूस व थंड शीतपेय विक्रेत्यांवर अंकुश बसेल. जेथे अन्न पदार्थ तयार केले जातात, तेथे घाणीचे साम्राज्य असू नये, असा नियम आहे. कारण घाणीवर घोंघावणाऱ्या तेथील माशा त्या पदार्थावर जाऊन बसतात. तेथून नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण होते. हागवण व डायरीयाचे आजारही यापासून होण्याची दाट शक्यात असते. उन्हळ्याची आग शामविण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात शीतपेय पिण्यासाठी धाव घेतात. परंतु त्यांना नियमाने सेवा मिळत नाही. यातून नकळत त्यांना अनेक आजाराला सामोरे जावे लागते. (प्रतिनिधी)
काय आहे नियम ?
ज्या ठिकाणी अन्न पदार्थ किंवा इतर ज्यूस व थंड पदार्थ तयार केले जातात तेथे घाणीचे साम्राज्य असू नये, नेहमी हा परिसर स्वच्छ ठेवावा, प्लेट्स व ग्लास धुण्यासाठी स्वतंत्र बेसीन असावे, ज्या ठिकाणी हे शीतपेय किंवा अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात त्या ठिकाणी अन्न सुरक्षा मानद कायद्यानुसार पाळीव प्राणी उदा. कुत्रे, मांजर व इतर प्राण्यांचा वावर असू नये. जे पाणी नागरिकांना पिण्यासाठी देण्यात येते त्या पाण्याची तपासणी जिल्हा वैद्यक प्रयोगशाळेत करवून तेथील पाणी पिण्यास योग्य आहे, यासंदर्भाचे प्रमाणपत्र शीतपेय किंवा इतर हॉटेलमध्ये लावून ठेवावा. यासर्व नियमांचे उल्लंघन होत असेल तर नियमाने अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा किंवा शीतपेय विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे.
शहरात शंभराच्यावर शीतपेय विक्रेते
शहरातील विविध मोठ्या चौकांत शहरातील व परप्रांतीय शीतपेय विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्याची संख्या शंभरच्यावर आहे. तीन ते चार महिन्यांचा त्यांचा व्यवसाय राहतो. पण अनेक शीतपेय विक्रेत्यांनी व ज्यूस सेंटरच्या संचालकांनी एफडीए विभागाकडून नोंदणी किंवा परवाना घेतले नसल्याची माहिती आहे.