कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३९ लाखांचे वेतन थकीत; 'प्रहार'चे 'थाळी वाजवा' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 15:30 IST2025-04-18T15:29:40+5:302025-04-18T15:30:47+5:30

Amravati : 'इर्विन'मध्ये 'सीएस'च्या दालनात पाच तासापर्यत सुरू होते ठिय्या; तोडगा निघाल्याने तिढा सुटला.

Contractual employees' salaries of Rs 39 lakhs are due; 'Prahar' launches 'thali bajao' protest | कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३९ लाखांचे वेतन थकीत; 'प्रहार'चे 'थाळी वाजवा' आंदोलन

Contractual employees' salaries of Rs 39 lakhs are due; 'Prahar' launches 'thali bajao' protest

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
जिल्हा स्त्रीरुग्णालयात कार्यरत सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तब्बल ३९ लाख रुपयांचे वेतन एजन्सीने थकीत असल्याप्रकरणी गुरुवारी प्रहार संघटनेने 'थाळी वाजवा' आंदोलन करून 'सीएस'च्या दालनात पाच तास ठिय्या दिला. दरम्यान, पोलिसही दाखल झाले. 


आंदोलक मागणीवर कायम असल्याने अखेर या वेतन निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशा लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. थाळी वाजवा आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे वसू महाराज यांच्या नेतृत्वात इर्विन चौकातून प्रारंभ करण्यात आले. कंत्राटी सहा कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटंबातील सदस्यही या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एजन्सीने वेतन थकविल्याबद्दल २०२३ पासून पत्रव्यवहार करूनसुद्धा आजपर्यंत त्या पत्रावर प्रशासनाने कोणतीही पूर्तता केली नाही, असा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख गौरव ठाकरे यांनी यावेळी केला. किंबहुना राष्ट्रीय सफाई आयोगाचे अध्यक्ष एम. व्यकंटेशन यांनी निर्देश दिल्यानंतरही आरोग्य यत्रणेने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाही, ही बाब यावेळी मांडण्यात आली. जुलै २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३९ लाख ९ हजार इतके वेतन हिंदुस्थान सिक्युरिटी अॅण्ड इंटेलिजन्स सर्व्हिस यांनी अदा केले नाही, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. दरम्यान, वसू महाराज यांनी आरोग्य यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांनी सकारात्मक पुढाकार घेत सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी जिल्हा लेखाव्यवस्थापक हे विशेष मानधन फरकाची ३९ लाख ९ हजारांचे मानधन मिळण्यासाठी स्वतः मुंबई येथे जातील. प्रहार संघटनेचा एक प्रतिनिधी सोबत जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन तूर्त मागे घेतले. यावेळी प्रहार संघटनेचे छोटू वसू महाराज, गौरव ठाकरे, नितीन शिरभाते, प्रशांत शिरभाते, मंगला खंडारे, सुरेश धनविजय, अर्चना डहाके, कीर्ती गणवीर, अलका इंगळे, संगीता गवळी आदी उपस्थित होते. 


लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३९ लाखांचे वेतन थकीत असल्याने गुरुवारी इर्विन रूग्णालयात प्रहारचे पाच तास आंदोलन चालले अखेर सीएस यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्याने हा तिढा सुटला

Web Title: Contractual employees' salaries of Rs 39 lakhs are due; 'Prahar' launches 'thali bajao' protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.