अंजनगावात दूषित पाणी पुरवठा
By Admin | Updated: August 4, 2016 00:11 IST2016-08-04T00:11:41+5:302016-08-04T00:11:41+5:30
अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील १५९/७९ गावांना अनेक दिवसांपासून अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून...

अंजनगावात दूषित पाणी पुरवठा
जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : जलप्रकल्पावर सुरक्षेचा अभाव, जिजाऊ ब्रिगेडने दिले निवेदन
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील १५९/७९ गावांना अनेक दिवसांपासून अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून साथरोगांचा फैलाव वाढल्यामुळे त्यामुळे तालुक्यामधील ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यात आजारी रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील जीवन प्राधिकरणाच्या जलप्रकल्पावरून दोन शहरांसह इतर गावांना पाणीपुरवठा होत असताना एका वृद्ध सुरक्षा रक्षकाशिवाय इतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था येथे नाही.
अंजनगाव व सुर्जी या दोन शहरामध्ये असलेल्या लाखो लीटर साठवणुकीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ वराहांचा मुक्त संचार दिसून येतो. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी अखेर आक्रमक होवून आंदोलनाचा पवित्रा घेतला. आठ दिवसात गढूळ पाणीपुरवठा बंद न झाल्यास आंदोलनाचा त्यांनी इशारा जीवन प्राधिकरण कार्यालयाला दिला आहे. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर या दोन शहरांसह १५६ व ७९ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत पाणीपुरवठा होत असून अनेक दिवसापासून अतिशय गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. वैद्यकीय चाचणीनुसार हे पाणी पिण्यायोग्य नाही, तरी सुध्दा नाईलाजास्तव नागरिकांना हे अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार मजिप्रा कार्यालयात तक्रारी दाखल केल्या पण, अधिकाऱ्यांकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही. तसेच शहरातील फुटलेल्या पाईपलाईनमध्ये घाण पाणी शिरून पाणी दूषित होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोन शहरांना पेयजल पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या मजिप्रा शाखा अभियंत्यांंची बदली झाल्यामुळे अंजनगाव व सुर्जी शहराची जबाबदारी आता कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे हे सुध्दा कळत नाही. इतकेच नव्हे तर तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकांना मजिप्रा कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. अखेर जिजाऊ बिग्रेडने याप्रकरणाची दखल घेतली. या महिलांनी मजिप्राचे उपअभियंता (प्रभारी) डी.के.राऊत यांना आठ दिवसांत गढूळ पाणीपुरवठा सुरळीत करुन स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे निवेदन देण्यात आले. स्वच्छ पाणी न मिळाल्यास यानंतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सीमा कोल्हे, सारिका मानकर, राधा सावरकर, सीमा घोगरे, सविता बीजेवार, स्मिता लहाने, मीना कोल्हे, संगीता दाळू, वर्षा सावरकर, निलिमा कडू, अर्चना तुरखडे उपस्थित होत्या. दोन शहरांसह १५६/७९ गावातील नागरिकांच्या जीवाशी मजिप्राने चालविलेला खेळ तत्काळ थांबविण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडद्वारे करण्यात आली आहे. गढूळ व दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार बळावले आहेत. यावर अंकुश लावण्याकरिता मजिप्राने सहकार्य करावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
उपसलेला गाळ पुन्हा धरणात
पावसाळा लागण्यापूर्वी शहानूर धरणाचे खोलीकरण करण्यात आले. पण त्यातील उपसलेला गाळ धरणाच्या शेवटच्या टोकाजवळ व धरणाच्याच काठाजवळ नेऊन टाकल्यामुळे तो गाळ आलेल्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात पुन्हा धरणामध्ये शिरला. यामुळे गढूळ पाणी येत असल्याची परिसरात चर्चा आहे. गाळाची योग्य विल्हेवाट लावली असती तर ही समस्या उदभवली नसती.
दोन दिवसांत शेकडो रुग्णांची नोंद
अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णांलयामध्ये दोन दिवसांत शेकडोे रुग्णांची नोंद झाल्याचे दिसून येते. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार बळावत असून यामुळे खासगी व शासकीय रूग्णालयांमध्ये रूग्णांची चिकार गर्दी दिसून येत आहे.
विनापरवाना नळ कनेक्शन घेणाऱ्यांनाच दूषित पाणी
स्थानिक काही लोकांनी त्यांच्या रहात्या घरी विनापरवाना खड्डे खोदून नळ कनेक्शन घेतले. त्यांच्याच घरी खड्ड्यांमधून गढूळ पाणी पुरवठा होत आहे. शहानूर जल प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा हा शुध्दच आहे. असे मजिप्राचे उपअभियंता डी.के.राऊत यांनी सांगितले.