गोवंशाचा कंटेनर मुर्तिजापूरहून निसटला, दर्यापूर पोलिसांनी पकडला; ३५ जनावरांची सुटका
By प्रदीप भाकरे | Updated: July 28, 2023 17:06 IST2023-07-28T16:59:31+5:302023-07-28T17:06:28+5:30
ट्रॅक्टर ट्रॉलीला उडवून काढला होता दर्यापूरकडे पळ

गोवंशाचा कंटेनर मुर्तिजापूरहून निसटला, दर्यापूर पोलिसांनी पकडला; ३५ जनावरांची सुटका
अमरावती : पोलिसांना न जुमानता व रस्त्यात आडव्या करून ठेवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला उडवून मुर्तिजापूरहून पळालेला गोवंशाचा कंटेनर दर्यापूर पोलिसांनी पकडला. २८ जुलै रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली. त्या कंटेनरसह त्यातील ३५ जनावरांची सुटका करण्यात आली. दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली.
२८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास कारंजा मार्गे मूर्तिजापूरकडे कंटेनरने अवैधरित्या गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मुर्तिजापुर पोलिसांनी मिळाली. तो गोवंश असलेला कंटेनर थांबवण्याकरिता पोलिसांनी पाठलाग सुरू केला होता. कंटेनरला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केल्यावरही कंटेनरच्या चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवत नेले, मुर्तिजापुर पोलिसांनी मार्गामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली आडवे करून कंटेनर अडविण्याचा प्रयत्न केला असता कंटेनरचालकाने ट्रॅक्टर ट्रॉली उडवून दर्यापूरकडे पळ काढला होता. मूर्तिजापूर पोलिसांकडून ती माहिती दर्यापूर पोलिसांना देण्यात आली.
दर्यापूर पोलिसांची नाकाबंदी
माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावर त्वरित नाकाबंदी केली. तथा मुर्तिजापूर टी-पॉईंटवर कंटेनर थांबविला. त्या कंटेनरमध्ये एकूण ३५ गोवंश मिळून आले. तथा दोन आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले. आरोपी व मुद्देमाल मूर्तिजापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.