रेल्वे वॅगन प्रकल्पाच्या निविदेचा मुहूर्त निघाला
By Admin | Updated: January 3, 2015 00:29 IST2015-01-03T00:29:20+5:302015-01-03T00:29:20+5:30
बडनेरा येथे साकारला जाणाऱ्या रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याच्या प्रकल्पाच्या निविदा १६ जानेवारी रोजी उघडणार आहेत. याच दिवशी प्रकल्प बांधकामाची एजंसी निश्चित होणार आहे.

रेल्वे वॅगन प्रकल्पाच्या निविदेचा मुहूर्त निघाला
अमरावती : बडनेरा येथे साकारला जाणाऱ्या रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्याच्या प्रकल्पाच्या निविदा १६ जानेवारी रोजी उघडणार आहेत. याच दिवशी प्रकल्प बांधकामाची एजंसी निश्चित होणार आहे. या प्रकल्पाच्या शुभारंभासाठी रेल्वेमंत्र्यांशी संपर्क सुरू आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखाना बांधकामाचा शुभारंभ नव्या वर्षात होणार आहे. त्याकरिता बिहारच्या पटणा येथील रेल्वे बांधकाम विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखाना जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पातून सुमारे एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. साडेपंधरा कोटी रूपये खर्चून या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम पूर्णत्वासाठी रेल्वेने खासकरून उपअभियंता मोहन नाडगे यांची नियुक्ती केली आहे.
नाडगे यांच्या देखरेखीत रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखाना हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा १६ जानेवारीला निविदा उघडण्याच्या माध्यमातून सुरू होत आहे. एकदा एजंसी ठरली की, प्रशासकीय कामे वेगाने सुरू होतील, असे संकेत आहे. दरम्यान खासदार आनंदराव अडसूळ यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित केले आहे. अद्यापपर्यंत रेल्वेमंत्र्यांनी याविषयी काहीच कळविले नसले तरी रेल्वेमंत्र्यांना आणण्यासाठी खासदार आग्रही असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)