चैतन्य परतले, स्थिती पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST2021-06-02T05:00:00+5:302021-06-02T05:00:31+5:30
जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात चार महिन्यांपासून संचारबंदी सुरू आहे. या कालावधीत कित्येकांचे रोजगार हिरावले होते. या सर्व चेहऱ्यांवर आता हास्य फुलले आहे. महिनाभरापासून बंदच असलेल्या बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये आवश्यक खरेदीसाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. व्यापारी वर्गानेदेखील जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केेले आहे.

चैतन्य परतले, स्थिती पूर्वपदावर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ९ मेपासून राबविण्यात येत असलेल्या संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने मंगळवारपासून बाजारपेठेत चैतन्य परतले. मात्र, सर्व प्रतिष्ठानांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांसह त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार आहे. त्याकडे स्थानिक प्रशासनाची करडी नजर आहे.
जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात चार महिन्यांपासून संचारबंदी सुरू आहे. या कालावधीत कित्येकांचे रोजगार हिरावले होते. या सर्व चेहऱ्यांवर आता हास्य फुलले आहे. महिनाभरापासून बंदच असलेल्या बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये आवश्यक खरेदीसाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. व्यापारी वर्गानेदेखील जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केेले आहे.
राज्यातील दुसऱ्या कोरोना लाटेची सुरुवातच अमरावतीपासून झाली. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यातील चर्चेनंतर २१ फेब्रुवारीपासून आठवड्याअंती कफ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर ५ एप्रिलपासून निर्बंध कठोर करण्यात आले. २२ एप्रिलपासून दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असे चित्र होते. ९ मे पासून मिनी लॉकडाऊन जिल्ह्यात सुरू झाले, ते १ जूनला बऱ्याच प्रमाणात मोकळे झाले. या तीन आठवड्यांच्या कालावधीत बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होती. त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
दुपारी ३ च्या आत घरात
जिल्हा प्रशासनाने शिथिलता दिली असली तरी दुपारी ३ नंतर संचारबंदी कायम आहे. त्यामुळे वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर जाता येणार नाही, अन्यथा त्या व्यक्तीचे वाहन जप्त करण्याची तंबी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
बिगर जीवनावश्यक दुकानांमध्ये जास्त गर्दी
संचारबंदी शिथिल झाल्याच्या पहिल्या दिवशी जीवनावश्यक तसेच बिगर जीवनावश्यक आस्थापना, प्रतिष्ठानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यामध्ये रेडीमेड, कापडांची दुकाने, स्टेशनरी, सलून, बूक स्टॉल आदी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. सकाळच्या वेळी दुकानांची स्वच्छता सुरू असल्याचे दिसून आले, तर दुपारी २ च्या आत आटोपण्याची लगबग सुरू होती.
प्रतिक्रिया
रुग्णसंख्या कमी होत असल्याने संचारबंदीत शिथिलता देण्यात आली. पण लॉकडाऊन नको असल्यास नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर निघू नये, गर्दी करू नये, त्रिसूत्रीचे पालन महत्त्वाचे आहे.
- प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका
बाजारपेठ सुरू करण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती. मंगळवारपासून सकाळी ७ ते २ दरम्यान व्यवसाय करण्याची मुभा मिळाली. पूर्णपणे ठप्प असलेले आर्थिक गाडी रुळावर येईल. पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी होती. कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.
- अब्दुल रफीक, फळविक्रेता
नवे कपडे हवेच, याबाबत मुलांनी हट्ट धरला होता. त्यामुळे मंगळवारी लॉकडाऊन शिथिल होताच बाजारपेठ गाठली. दंड वाढविल्याने कोरोना नियमावलीचे भान ठेवावे लागले. चैतन्याची ही स्थिती यापुढेही कायम राहावी, ही अपेक्षा आहे.
- रणजित मेश्राम, मंगलधाम कॉलनी
अवलोकन करता येणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. वर्षभराचे टार्गेट पूर्ण करणारा लग्नसोहळा व ईद या दोन मोठ्या संधी गमाविल्या गेल्या आहेत. दोन वर्षांपासून ही स्थिती ओढवलेली आहे.
- विजय भुतडा
अध्यक्ष, बिझीलॅन्ड व्यापारी संघ
विदर्भात पहिल्या क्रमांकाच्या असलेल्या बाजारपेठेचे किमान दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामीणमध्ये संसर्ग असताना शहरात कर्फ्यू लावला व व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. बिकट परिस्थिती ओढावलेली आहे.
- पप्पू गगलानी, सचिव
तखतमल व्यापारी संघ
दोन महिन्यांनंतर आता दुकाने उघडल्यानंतर व्यापारी वर्गाला बरे वाटत आहे. कर्मचारीही सुखावले आहेत. मात्र, आमचा लग्नसराईचा धंदा बुडाला. आम्ही किमान तीन वर्षे मागे गेलो. यात दुकानदार, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
- किशन कोटवानी
अध्यक्ष, सिटीलॅन्ड वेलफेअर असो.