महापालिकेत काँगे्रस-राष्ट्रवादीत धुसफूस
By Admin | Updated: July 6, 2014 23:35 IST2014-07-06T23:35:47+5:302014-07-06T23:35:47+5:30
महापालिकेत सत्तापक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये काही मुद्यांवरुन धुसफूस सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही गटांत खेळीमेळीचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर राजकीय

महापालिकेत काँगे्रस-राष्ट्रवादीत धुसफूस
आपसात दरी वाढली : शह-काटशहाच्या राजकारणाला प्रारंभ
गणेश वासनिक - अमरावती
महापालिकेत सत्तापक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये काही मुद्यांवरुन धुसफूस सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही गटांत खेळीमेळीचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर राजकीय समीकरण पूर्णत: बदलले आहे. हल्ली लहान, मोठ्या कारणांवरुन शह-काटशह देण्यास सुरूवात झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास ही संभाव्य नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते.
आ. रावसाहेब शेखावत आणि माजी आमदार सुलभा खोडके यांचे वर्चस्व असलेल्या काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने महापालिकेत २०१२ मध्ये सत्ता स्थापन केली. या दोन्ही नेत्यांनी आपसात करार करून पहिल्या वर्षी काँग्रेसच्या वाट्याला महापौर तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद देण्याचे ठरविण्यात आले. दोन्ही गटांना अडीच-अडीच वर्षांसाठी स्थायी समिती सभापतीपद देण्याचे सूत्र ठरविण्यात आले. तसेच दुसऱ्या टप्प्यातील महापौरपद राष्ट्रवादीकडे तर उपमहापौरपद काँग्रेसला देण्याचा लिखित करार झाला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आ. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा-कौर यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सचिव संजय खोडके यांनी जोरकसपणे विरोध दर्शविला. ही उमेदवारी मान्य नाही आणि प्रचारही करणार नाही, असे प्रदेशाध्यक्षांसमोर खोडके यांनी स्पष्ट सांगितले. परिणामी संजय खोडकेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली. २३ सदस्य संख्येच्या राष्ट्रवादीतून सात सदस्यांनी खोडके यांच्याशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. १६ सदस्य खोडके गटासोबत राहिलेत. या गटाचे गटनेता म्हणून अविनाश मार्डीकर तर सात सदस्यांच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनील काळे यांनी महापालिकेत कामकाज सांभाळण्यास सुरूवात केली आहे. आता काँग्रेस-राकाँमधील ही धुसफूस कोणते वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.