रबीच्या हंगामाने वाढविली चिंता
By Admin | Updated: December 7, 2014 22:44 IST2014-12-07T22:44:02+5:302014-12-07T22:44:02+5:30
खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबी पिकाची आस लावून होता. परंतु दीड महिना उशिरा खरिपाचा हंगाम, सोयाबीन पिकाचा फटका, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे यंदाच्या रबी

रबीच्या हंगामाने वाढविली चिंता
अमरावती : खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबी पिकाची आस लावून होता. परंतु दीड महिना उशिरा खरिपाचा हंगाम, सोयाबीन पिकाचा फटका, जमिनीत नसणारी आर्द्रता यामुळे यंदाच्या रबी हंगामात कृषी विभागाने नियोजन केलेल्या क्षेत्रापेक्षा अर्ध्याच क्षेत्रात रबीची पेरणी झाली आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
खरीप २०१४ च्या हंगामात पेरणीच्या जून महिन्यापासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यात खरिपाचे ५० टक्के क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला. सोयाबीन पिकाला वाढीसाठी कालावधी मिळाला नाही. रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस नाही यामुळे शेंगा पोचट राहिल्या. शेंगामधील दाणा बारीक पडला. परिणामी सरासरी उत्पन्नात ५० ते ७० टक्क्यांनी घट झाली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले. या परिस्थितीत किमान कपाशी व तुरीचा भरवसा शेतकऱ्यांना होता. परंतु कपाशीवर आलेला लाल्या, जमिनीत आर्द्रता कमी असल्याने कपाशीची न फुटणारी बोंडे, फुटलेच तर अर्धवट स्थितीत. यामुळे खालावलेला कापसाचा दर्जा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत आहे.
जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे तुरीची झालेली बहरगळ, शेंगा भरण्याच्या स्थितीत शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशी व तुरीच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने खरिपाची ४६ पैसेवारी घोषित करून जिल्ह्याच्या या विदारक चित्रावर शिक्कामोर्तब केले आहे.
खरिपाच्या पिकाची दैना झाल्यावर रबीचा सहारा मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु खरीपाचा हंगामच दीड महिना माघारल्याने रबीची पेरणीदेखील उशिरा सुरू झाली. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे हरभरा पिकाची उगवणशक्ती कमी झाली आहे. हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी साधारणपणे १५ नोव्हेंबर समजण्यात येतो. परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यात रबीची केवळ ४३ टक्केच पेरणी झाली आहे. या रबीच्या हंगामाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहेत. खरिपात पूर्वीच कर्जबाजारी झालेला शेतकरी रबीमुळे आणखी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)