गतिमानतेसाठी ई-आॅफिस संकल्पना महत्त्वाची
By Admin | Updated: May 2, 2015 00:26 IST2015-05-02T00:26:20+5:302015-05-02T00:26:20+5:30
प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. गतिमानता येते, ...

गतिमानतेसाठी ई-आॅफिस संकल्पना महत्त्वाची
विभागीय आयुक्त : संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
अमरावती : प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. गतिमानता येते, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ई-आॅफिस संकल्पना आत्मसात करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
येथील सहसंचालक लेखा व कोषागारे विभागाच्यावतीने लेखा कोषभवन येथे आयोजिलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्र व 'टेक डे' चे उद्घाटन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी उपस्थित होते. स्थानिक निधी लेखा सहसंचालक बी. व्ही. तांबडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
राजूरकर म्हणाले की, शासनाची कामकाजातील पारदर्शकता आणि गतिमानता यावर विशेष भर आहे. यासाठी प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. ई-आॅफिससंदर्भात बैठका होत आहेत. संपूर्ण कामकाज अद्यापही १०० संगणकांवर झालेले नाही. प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. अर्थ विभागामुळे शासनाच्या सर्वच विभागात शिस्त आहे. त्यामुळे लेखा व कोषागारे विभाग हा महत्त्वाचा आहे. प्रशिक्षणासाठी वयाची आणि पदाची गरज नाही. सर्वांनीच संगणकाचे ज्ञान आत्मसात करावे आणि ई-आॅफिस संकल्पना आत्मसात करावी, असे आवाहन केले. लेखा कोषभवन इमारतीत प्रशिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही याठिकाणी प्रशिक्षण देण्यात यावे.
सीईओ भंडारी यांनी लेखा व प्रशिक्षणाचे कामकाजातील महत्त्व सांगून सेवापुस्तके आॅनलाईन करण्याचा प्रयत्न करावा. काही ठिकाणी हा प्रयोग होत असून अशा कामाची गती वाढविण्याची त्यांनी गरज प्रतिपादित केली.सहसंचालक बी. व्ही. तांबडे म्हणाले की, येथे दर शुक्रवारी विना मोबदला दोन तास प्रशिक्षण देण्यात येते याचा सर्वांनी लाभ घ्यावा. प्रास्ताविकात सहसंचालक सुधाकर सिद्धेवाड म्हणाले की, आॅगस्ट २०१४ पासून या कार्यालयास प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित केले आहे. याच कोषागारे, ५० उपकोषागारांमार्फत येणारा सर्व निधी आहारित केला जातो. जमेच्या बाजू सर्व कोषागारामार्फत होतात. मनुष्यबळाची अडचण असली तरी सर्व कोषागारांचे पेमेंट सीएमपीद्वारे होते. तसेच ३९ उप कोषागारांमार्फतही सीएमपीद्वारे पेमेंट होते. सर्वांनी सीएमपी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या कार्यालयाकडून ११ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेत. ७१४१४ निवृत्तीवेतन धारकांना १ तारखेस सीएमपीद्वारे पेमेंट करण्यात येते. सेवानिवृत्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॉल सेंटर फॉर पेन्शनर्स उपक्रमही राबविला जातो. २४ तासांच्या आत आॅनलाईन तक्रार सोडविण्यात येते. (प्रतिनिधी)