अमरावती, बडनेरा रेल्वे स्टेशनवर संकु ल
By Admin | Updated: July 18, 2015 00:08 IST2015-07-18T00:08:30+5:302015-07-18T00:08:30+5:30
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेवर व्यापारी संकुल साकारले जाणार आहे.

अमरावती, बडनेरा रेल्वे स्टेशनवर संकु ल
बीओटी तत्त्वावर पुनर्विकास : उत्पन्नवाढीसाठी निर्णय
अमरावती : अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेवर व्यापारी संकुल साकारले जाणार आहे. त्यामुळे विनाकारण पडून असलेल्या जागेचा कायापालट होऊन रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाने बेरोजगारी दूर होण्याचे चित्र आहे.
देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यात महाराष्ट्रातील ३८ रेल्वे स्थानकांचा समावेश असून ‘अ’ वर्गात मोडणाऱ्या अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असल्याने अतिरिक्त जागेचा व्यावासायिक उद्देशासाठी वापर करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी आवश्यक हालचाली सुरू आहेत. अमरावतीत साकारण्यात आलेल्या भव्यदिव्य मॉडेल रेल्वे स्थानकाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी मोठी यंत्रणा लागत असल्याने रेल्वेला आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
बीओटी तत्त्वावर साकारणार संकुल
अमरावती : येत्या काळात अमरावती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास झाल्यास उत्पन्नातून येणारी रक्कम ही या स्थानकावर खर्च करुन प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा देण्यावर भर राहणार आहे. अमरावती रेल्वे स्थानक परिसरातील इर्विन रुग्णालयाच्या भागात अतिरिक्त जागा असून या जागेवर व्यापारी संकुल उभारल्या गेल्यास मोठी रक्कम रेल्वेला मिळेल, यात शंका नाही. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना अतिरिक्त जागेवर व्यापारी संकुल निर्माण करताना खासगी क्षेत्रासह सर्व इच्छुकांकडून स्पर्धात्मक निविदा मागवण्यिाचे धोरण आहे. ही व्यापारी संकुल बीओटी तत्त्वावर साकारण्यावर भर दिला जाईल, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या नव्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोयीसुविधा पुरविताना कोणताही खर्च लागणार नाही.रेल्वे स्थानकावर असलेल्या अतिरिक्त जागेच्या अनुषंगाने निविदाकर्ता आपल्या कल्पकतेनुसार व डिझाईननुसार स्टेशनचा पुनर्विकास करेल, असे या योजनचे स्वरुप आहे. काही वर्षांपासून ओस पडलेल्या अतिरिक्त जागेचा कमर्शियल वापर होणार असल्याने रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध होईल.
बडनेऱ्यात ‘प्लॅटफार्म कम संकुल’
मध्य रेल्वे भुसावळ विभागांतर्गत येणाऱ्या बडनेरा रेल्वे स्थानकाचा दर्जा ‘ए’ असल्याने पुनर्विकास या योजनेत या स्टेशनवर पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. जुने गुडस् शेड असलेल्या फलाटावर ‘प्लॅटफार्म कम संकुल’ साकारले जाईल. तसेच यापूर्वी मंजूर असलेल्या स्वयंचलित पायऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत. त्यानुसारच बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास अंतर्गत निविदा काढल्या जातील अशी माहिती आहे. अमरावतीत व्यापारी संकुल उभारण्याचे प्रस्तावित आहे.