वाडेगावातील वृक्षारोपणाची आयुक्तांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:23+5:302021-09-19T04:14:23+5:30
वरूड : तालुक्यातील वाडेगाव येथे मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायतने वृक्षारोपण केले. ग्रामरोजगार सेवकाने याकरिता दाखविलेली मजूरसंख्या बनावट असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने ...

वाडेगावातील वृक्षारोपणाची आयुक्तांकडे तक्रार
वरूड : तालुक्यातील वाडेगाव येथे मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायतने वृक्षारोपण केले. ग्रामरोजगार सेवकाने याकरिता दाखविलेली मजूरसंख्या बनावट असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने करून यामध्ये २०१५ ते १९ दरम्यान भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २०१५-१६ मध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि श्रीमंत लोकसुद्धा मजूर म्हणून यादीत दाखवून देयके काढण्यात आली. याबाबत चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी गजानन डहाके यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
तक्रारीनुसार, वाडेगाव येथे मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायतीने २०१५ ते २०१९ या कालावधीत केलेल्या वृक्षारोपणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. रोजगार सेवकाने वृक्षारोपणाकरिता दाखविलेली मजूरसंख्या खोटी असून सर्व मजूर रोजगार सेवकाचे नातेवाईक आहेत. गावातील प्रतिष्ठित नागरिक, श्रीमंत तसेच २०१५-१६ मध्ये तर ग्रामपंचायत सदस्यसुद्धा मजुरांच्या यादीत आहे. रोजगार सेवकाचा भाऊ मध्यप्रदेशात असूनही वृक्षारोपणावर मजूर दाखविण्यात आला. विशेष म्हणजे, कागदावर असलेली रोपसंख्या प्रत्यक्षात नाही. मनरेगा अंतर्गत केलेल्या वृक्षारोपणाची चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार उघड होऊ शकतो. यात शासकीय रकमेचा अपहार झाला आहे. गजानन डहाके यांनी आ. देवेंद्र भुयारांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदारांना तक्रार दिली.
----------
रोजगार हमी योजनेतून वाडेगावात वृक्षारोपण करण्यात आले. अपेक्षेपेक्षा अधिक वृक्ष लागवड करून गाव सुशोभित केले, तर कामावर असलेले मजूरसुद्धा गरीबच आहेत. त्यांची खात्री करण्यात आली आहे. सदस्य गरीब असल्यास काम करणे गुन्हा आहे काय? केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित तक्रारी केल्या जात आहेत. यामुळे ग्रामविकासाला खीळ बसेल.
- सुधाकर दोड, सरपंच, वाडेगाव