महाविद्यालये बंद, तरीही परीक्षांच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:45+5:302021-03-17T04:14:45+5:30
अमरावती : महाविद्यालये बंद असली तरी संत गाडगेबाबा विद्यापीठाने शैक्षणिक सत्रानुसार येत्या २२ मार्चपासून अभियांत्रिकी, तर १५ एप्रिलपासून इतर ...

महाविद्यालये बंद, तरीही परीक्षांच्या तयारीला वेग
अमरावती : महाविद्यालये बंद असली तरी संत गाडगेबाबा विद्यापीठाने शैक्षणिक सत्रानुसार येत्या २२ मार्चपासून अभियांत्रिकी, तर १५ एप्रिलपासून इतर परीक्षांचे नियोजन चालविले आहे. वेळापत्रक तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.
हिवाळी २०२० परीक्षांना कोरोनामुळे ग्रहण लागले. यापूर्वी दाेन वेळा परीक्षांचे वेळापत्रक, तारीख निश्चित झाल्यानंतरही त्या पुढे ढकलाव्या लागल्या. आता परीक्षा विभागाने हिवाळी २०२० परीक्षांसह मॉडरेशनची कामे वेगाने करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. २२ मार्चपासून अभियांत्रिकीच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात येतील, असा निर्णय झाला आहे. १५ एप्रिलपासून हिवाळी २०२० परीक्षांत अभियांत्रिकी वगळता इतर अभ्यासक्रमांचे पेपर ऑनलाईन प्रणालीने घेण्यात येणार आहेत. साधारणत: १५ एप्रिलपासून परीक्षा राहतील, अशा दृष्टीने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. या परीक्षा महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन प्रणालीने पार पडणार आहेत. यासंदर्भात कुलगुरूंकडे नोटशिट मान्यतेसाठी पाठविली आहे.
---------------
हिवाळी परीक्षांमध्ये अडीच लाख विद्यार्थी
हिवाळी २०२० अभियांत्रिकी परीक्षांमध्ये ३० हजार, तर अन्य परीक्षांत २.२५ लाख असे सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन वेगाने सुरू झाले आहे. कोरोना संसर्गाच्या सावटात या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत विद्यापीठाचा भर आहे. महाविद्यालयांवर परीक्षा आणि मूल्यांकनाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी परीक्षा २२ मार्चपासून प्रारंभ होणार असून, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पाठविले आहे.
---------------------
हिवाळी २०२० परीक्षेत अडीच लाख विद्यार्थी पेपर देतील. तशी तयारी सुरू झाली आहे. कोरोनाचे संकट असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविले आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.