जिल्हाधिकाऱ्यांची जलयुक्त शिवारच्या कामावर स्पॉट व्हिजिट
By जितेंद्र दखने | Updated: May 22, 2024 21:04 IST2024-05-22T21:03:38+5:302024-05-22T21:04:06+5:30
अचलपूर तालुक्यातील निजामपूर गावात कामांची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची जलयुक्त शिवारच्या कामावर स्पॉट व्हिजिट
अमरावती : जिल्हा परिषद जलसंधारण विभागामार्फत ग्रामीण भागात जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहेत. या कामांची मंगळवारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ संतोष जोशी यांनी अचलपूर तालुक्यात काही गावांना ऑन दी स्पॉट व्हिजिट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
जलयुक्त शिवार अभियान २.० हे राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानातील कामांना गती वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘ जलयुक्त शिवार अभियान २.०’ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे. यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत ग्रामीण भागात सध्या विविध प्रकारची कामे केली जात आहेत. दरम्यान, मंगळवार, २१ मे रोजी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अचलपूर तालुक्यातील निजामपूर येथे सुरू असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांची ऑन दी स्पॉट पाहणी केली. यावेळी झेडपीचे सीईओ संतोष जोशी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, उपअभियंता विजय राठोड, अचलपूर एसडीओ बळवंत अरखराव, तहसीलदार डॉ.संजय गरकल आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्याचे दिवस जवळ आले असल्यामुळे जलयुक्त शिवारची कामे येत्या ३१ मेपर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित सर्व यंत्रणांना दिले आहेत. जलयुक्त शिवारची कामे मुदतीत केल्यास पावसाळ्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी साठ्यात वाढ होऊन याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांची गती वाढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.