लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : एका वर्गखोलीत तब्बल ७० विद्यार्थी, तीन जणांच्या बेंचवर सहाजण, कपडे वाळविण्यासाठी थेट छताचा वापर, निवासाची गुरांप्रमाणे व्यवस्था, डबल डेकर पलंगावर चढण्यासाठी शिडी नाही, खिडक्यांची तावदाने फुटल्याने पावसाने गाद्या ओल्या झालेल्या; तो कित्ता शिक्षणात. पुस्तके नाहीत, गणवेश नाही, परिणामी विद्यार्थी 'ढ'. लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ गेल्याचे चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेत धडकलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या निदर्शनास आला. हा सर्व प्रकार पाहून समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा यांच्यासह उपस्थित आमदारांनी प्रचंड संताप व्यक्त केला. बुधवारी समितीने जारिदा येथे उपकेंद्र व अचलपूर उपजिल्हा रुग्णालय व इतर ठिकाणी भेटी दिल्या.
चार दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आलेल्या समितीने प्रचंड संताप व्यक्त करीत मुख्याध्यापकांसह सर्वांना धारेवर धरले आणि चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मेळघाटात कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ ठरत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. या एकाच आश्रमशाळेतील हा प्रकार समितीला चक्रावून सोडणारा ठरला. आमदार दौलत दरोडा यांच्यासह समिती सदस्य आमदार केवराम काळे, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ व इतर सदस्य तसेच काटकुंभच्या सरपंच ललिता बेठेकर, रामलाल काळे, सहदेव बेलकर व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. एटीसी मात्र बेपत्ता होते. तब्बल २० मिनिटे वाट पाहूनही संगणक कक्ष उघडले गेले नाही. वाचनालयही कुलूपबंदच दिसून आले.
जारिदा उपकेंद्राला भेटसमितीने ५२ गावांना वीजपुरवठा होऊ घातलेल्या जारिदा उपकेंद्राच्या अडचणी जाणून घेतल्या. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट होती. बागलिंगा येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या आदिवासीच्या घरी समिती सदस्य निघाले.
डेट ऑफ बर्थ काय असते सर..?समिती सदस्यांनी अकरावीच्या विद्यार्थ्याला डेट ऑफ बर्थ विचारले. त्याने फक्त वर्ष सांगितले. तेथेच गुणवत्ता उघड झाली. विद्यार्थ्यांना स्टैंड अप म्हणताच 'स्टॅन्डअप्स' असा उच्चार त्यांच्याकडून आला.
ना छताला पंखा, ना जेवायला जागाइयत्ता पहिली ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या या आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असल्याने बसायला जागा नाही. वर्गखोल्या टिनाच्या व वसतिगृहातही पंखे नाहीत. जेवणासाठी व्हरांड्यात व पटांगणात बसावे लागत असल्याची विदारक स्थिती समितीला दिसून आली. बेंचवर तब्बल सहा विद्यार्थी बसतात कसे, हे पाहून सदस्य आश्चर्यचकित झाले.
कुठे गेले एटीसी ? पीओ नवीनराज्याच्या अनुसूचित जमाती कल्याण समिती दौऱ्यावर असताना डोमा आश्रमशाळेत एटीसी उपस्थित नसल्याबद्दल सदस्यांनी रोष व्यक्त केला. धारणी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी आठ दिवसांपूर्वीच रुजू झाल्याने तत्काळ बघतो, करतो याशिवाय प्रशासनाजवळ कुठलेच उत्तर नव्हते. जिल्हाधिकारी व सीईओदेखील हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले.