जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविणार स्वच्छता सप्ताह

By Admin | Updated: July 19, 2015 00:08 IST2015-07-19T00:08:23+5:302015-07-19T00:08:23+5:30

विद्यार्थ्यामध्ये स्वच्छतेविषयी जाणीव, जागृती निर्माण करणे तसेच आरोग्यविषयक चांगल्या सवयी अंगिकारणाच्या ...

Cleanliness week to be implemented in Zilla Parishad schools | जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविणार स्वच्छता सप्ताह

जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविणार स्वच्छता सप्ताह

स्वच्छ भारत मिशन : हात धुण्याच्या सवयीचा उपक्रम
अमरावती : विद्यार्थ्यामध्ये स्वच्छतेविषयी जाणीव, जागृती निर्माण करणे तसेच आरोग्यविषयक चांगल्या सवयी अंगिकारणाच्या दृष्टीने व त्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने शाळेच्या सत्रात ‘स्वच्छ परिसर शाळेचा, हात धुण्याच्या सवयीचा व स्वच्छतेच्या संदेशाचा’ उपक्रम २० ते २५ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवसी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय आहे त्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहे. सप्ताहांतर्गत पहिल्या दिवसी व दररोज प्रार्थनेच्या व परिपाठाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या सवयी, योग्य पद्धती, हात न धुतल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, हात धुण्याचे फायदे व स्वच्छतेच्या सहा संदेशाची माहिती देण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्गात एक मुलगा व एका मुलीची स्वच्छता दूत म्हणून निवड करून त्यांच्यामार्फत हात धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक करून देणार आहे. तसेच स्वच्छता संदेशाची माहिती देणार आहे. शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छताविषयक सोईसुविधेचा नियमित वापर करण्याविषयी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात येणार आहे, या सर्व वर्गात स्वच्छता संदेश, त्याविषयीची माहिती देणारे फलक लावण्यात येऊन प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हात धुण्याच्या सवईत सातत्य आणण्यासाठी दररोज मध्यान्न भोजनाच्या वेळी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकाऱ्यांद्वारा प्रत्येक गावासाठी एक संपर्क अधिकारी सर्व विभागाचे संपर्क अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच स्वच्छतेचा संस्कार होण्यासाठी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारा नियोजन करण्यात येऊन प्रत्येक शाळेत भेटी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

स्वच्छतेचे संदेश
स्वयंपाकापूर्वी, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी व नंतर साबनाने हात स्वच्छ धुवावे.
शौचालय बांधा व शौचालयाचा वापर नियमित करा.
नियमित नखे कापा.
अन्न झाकून सुरक्षित ठेवा.
पिण्याचे पाणी उंचावर ठेवा.

विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ
महात्मा गांधींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ळे फक्त राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पना पण होती. महात्मा गांधींनी पारतंत्र्याच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले.
आता भारतमातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्यकर्तव्य आहे.
मी शपथ घेतो की मी स्वत: स्वच्छतेच्या प्रति जागरुक राहील आणि त्यासाठी वेळही देईल.
दरवर्षी १०० तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन.
मी स्वत: घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही.
सर्वप्रथम मी स्वत:पासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली/वस्तीपासून गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन.
मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत, त्याचे कारण त्याठिकाणचे नागरिक स्वत: घाण करीत नाही व घाण करू देत नाहीत.
या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन.
मी आज जी शपथ घेतआहे, ती आणखी शंभर लोकांकडूनही करवून घेईन.
ते पण माझ्यासारखे स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन.
मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करीन.

Web Title: Cleanliness week to be implemented in Zilla Parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.