स्वच्छता कंत्राटदार काळ्या यादीत
By Admin | Updated: March 27, 2017 00:01 IST2017-03-27T00:01:22+5:302017-03-27T00:01:22+5:30
दैनंदिन स्वच्छतेच्या कामात कुचराई करणाऱ्या स्वच्छता कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

स्वच्छता कंत्राटदार काळ्या यादीत
‘लॉबी’ अस्वस्थ : महापालिका आयुक्तांचा निर्णय, फौजदारी कारवाईचाही प्रस्ताव
अमरावती : दैनंदिन स्वच्छतेच्या कामात कुचराई करणाऱ्या स्वच्छता कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. शनिवारी आयुक्तांनी ‘ब्लॅकलिस्ट’च्या नोटशिटवर स्वाक्षरी केली असून याबाबत सोमवार २७ मार्चला आदेश पारीत करण्यात येतील. महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दैनंदिन साफसफाईमधील ‘लॅक्युना’ उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामुळे कंत्राटदार लॉबीमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
ईसराजी महिला सुशिक्षित बेरोजगार नागरिकांची सेवा सहकारी संस्थेवर ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई करण्यात आली आहे. या संस्थेच्यावतीने प्रभाग क्र. ५ रामपुरी कॅम्प येथे दैनंदिन साफसफाई केली जात होती. मात्र, मागील काही दिवसांपासून यासंस्थेने स्वच्छतेच्या कामाकडे प्रचंड दुर्लक्ष केले.
स्वच्छतेबाबत तक्रारींचा खच
अमरावती : ‘इसराजी’या कंत्राटदार संस्थेचे काम अत्यंत बेजबाबदारपणे केले जात असून त्यांच्या कामांबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारींचा खच पडून आहे. पुरेसे कामगार नसणे, उपलब्ध मनुष्यबळाकडून साफसफाई करून न घेणे, अश तक्रारी आल्याने ‘इसराजी’ला वारंवार तोंडी लेखी समज देण्यात आली. कामात सुधारणा करण्यासाठी पुरेशी संधी दिली. या कंत्राटदारांच्या बेलगाम वृत्तीबाबत महापौरांसह संबंधित नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यात सुधारणा न झाल्याने यासंस्थेचे कंत्राट रद्द करावे, अशी विनंती ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांकडून प्रशासनाला करण्यात आली. याअनुषंगाने ‘इसराजी’ याकंत्राटदार संस्थेला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याच्या कारवाईला आयुक्तांनी हिरवी झेंडी दिली आहे.
कामगारांच्या संपामुळे आरोग्य धोक्यात
११ ते १४ मार्च दरम्यान इसराजी या कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या कामगारांनी संप पुकारल्याने याप्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला. घरगुती कचऱ्यासह नाल्या साफ करणे, कचरा गोळा करणे, कचरा संकलन, इत्यादी कामे ठप्प पडली. त्यामुळे मनपा प्रशासनाला नगरसेवक तथा नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. तरीही या कंत्राटदार संस्थेला स्वच्छतेविषयी जाग आली नाही. त्यापार्श्वभूमीवर यासंस्थेला काळ्या यादीत टाकण्याच्या कारवाईला आयुक्तांनी मान्यता प्रदान केली आहे.
कारवाई ‘मॅनेज’चे प्रयत्न
मनपाला ठेंगा दाखवून अमरावतीकरांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या यासंस्थेवर कारवाईचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून दाखल करण्यात आला. मात्र, ब्लॅकलिस्ट’च्या कारवाईवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्याने याकंत्राटदाराला वाचविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. या कंत्राटदाराची स्वत:च्या प्रशस्त दालनात भेटही घेतली. बोलणीही झाली. मात्र, आयुक्तांनी फाईलवर ‘ओके’ केल्याने ही सेटिंग बिघडली व त्या अधिकाऱ्यांचा नूरही पालटला.
स्वच्छतेबाबत आग्रही
महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवक दैनंदिन स्वच्छतेबाबत कमालीचे आग्रही असल्याने प्रशसनावर नैतिक दबाव आला आहे. आरोग्य आणि स्वच्छतेवर यापुढे अधिक भर देणार असल्याचे सांगत याकामात कुचराई करणाऱ्यांना विनाकारवाई सोडले जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. वर्षोगणती काम करणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर त्याचेविरुद्ध फौजदारी कारवाईच्या भीतीने कंत्राटदार अस्वस्थ झाले आहेत.