शहरात ३० वाहनांद्वारे घातली जाते गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:54+5:302021-02-05T05:26:54+5:30
अमरावती/ संदीप मानकर शहरात अलीकडे घरफोड्या व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून नेण्याच्या घटनाही ...

शहरात ३० वाहनांद्वारे घातली जाते गस्त
अमरावती/ संदीप मानकर
शहरात अलीकडे घरफोड्या व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून नेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातून रात्री संशयित आरोपींवर लक्ष ठेवण्याकरिता शहर हद्दीत ३० पेक्षा जास्त वाहनांद्वारे गस्त घालण्यात येते. यामध्ये ९ पेक्षा जास्त सीआर मोबाइल व्हॅनचाही समावेश आहे. तसेच प्रत्येक मोठ्या ठाण्यात बीट मार्शल, दामिनी पथकाद्वारेसुद्धा गस्त घालण्यात येते.
शहर आयुक्तालयाच्या हद्दीत सायबर पोलीस ठाणे वगळता १० ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालण्यात येते. यामध्ये सिटी कोतवाली फ्रेजरपुरा राजापेठ, गाडगेनगर या मोठ्या ठाण्यांत प्रत्येकी दोन किंवा तीन चारचाकी वाहने तसेच दोन सीआर व्हॅन अशी वाहने सेवेत आहेत. इतर ठाण्यांत ठाणेदारांना एक किंवा दोन चारचाकी वाहने व एक सीआर व्हॅन आहे. तीन ठाण्यांना अद्यापही मोबाइल सीआर व्हॅनची प्रतीक्षा आहे. तसेच पोलीस मुख्यालयातील विविध पथकांतील ४ पेक्षा जास्त वाहनांची शहर हद्दीत गस्त असते. रात्री १० वाजेपासून तर सकाळी ५ वाजेपर्यंत काही ठाण्यांतील ठाणेदार व त्यांचे पथक गस्त घालतात आपले अस्तित्व लपवून कुणी संशयित आरोपी किंवा तडीपार असलेला आरोपी शहर हद्दीत आढळून आल्यास त्याला ताब्यात घेतात. शहरातील काही हॉटेल्स, बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असतील तर सीआर व्हॅनच्या पथकाद्वारे त्यांना बंद करण्यासाठी सांगण्यात येते. तसे न केल्यास गुन्हा नोंदविण्यात येतो. पोलीस विभागाच्या मोटार वाहन विभागाकडे ५० मोठी वाहने तर १०१ चारचाकी वाहनांची नोंद आहे.
बॉक्स :
शहरात वर्षभरात २२४ घरफोड्या, तर ८४४ चोऱ्या
शहर हद्दीत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान वर्षभरात २२४ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी फक्त ६८ घरफोड्या उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, तर ८४४ चोरीच्या घटना घडल्या. यापैकी १८६ चोऱ्या उघडकीस आल्या. घरफोडीतील अट्टल गुन्हेगारांचा शोध शहर गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे घेतला जात आहे. गत आठवड्यात नागपुरी गेट पोलिसांनी अट्टल चोरट्याला अटक केली. त्याने १३ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
बॉक्स :
मध्यवर्ती आगारात गस्त
अमरावी मध्यवर्ती आगारात बसमध्ये चढताना अनेक प्रवाशांचे पाकीट, पैसे, सोने चोरीला गेल्याच्या घटना घडतात. त्याअनुषंगाने सिटी कोतवाली ठाण्याच्या पोलीस पथकाची येथे रोज दोन ते तीन वेळा गस्त असते. तसेच बसस्थानक परिसरातील हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. त्याअनुषंगाने रोज या ठिकाणी रात्री ११ वाजेनंतर सीआर व्हॅनद्वारे गस्त घालण्यात येते. अशा प्रकारे गस्त ही रेल्वेस्टेशन चौकात व रेल्वेस्थानकात घालण्यात येते.
शहरातील गस्तीवरील पोलीस वाहने
दुचाकी - ३०
चारचाकी ३०
कर्मचारी- ६०
बॉक्स :
जीपीएसद्वारे नियंत्रण
प्रत्येक सीआर व्हॅन ही जीपीएस सिस्टिमशी जोडल्या गेली आहे. तसेच त्याचे वायरलेस व वॉकीटॉकीद्वारे कंट्रोल रूमला लोकेशन असते. तसेच प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याची सीआर व्हॅन कुठल्या पररिसरात गस्त घालत आहे, याची माहिती असते.
कोट
नवीन मोबाइल सीआर व्हॅन व चारचाकी वाहने मिळविण्याकरिता प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. तसेच बीट मार्शल पेट्रोलिंग वाहने मिळाल्यास पोलीस विभागाला फायदाच होईल.
आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती