एलईडी दिव्यांनी शहर लखलखणार

By Admin | Updated: October 22, 2015 00:13 IST2015-10-22T00:13:29+5:302015-10-22T00:13:29+5:30

‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता एलईडी दिव्यांनी शहर प्रकाशमय करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला.

The city lights up with LED lights | एलईडी दिव्यांनी शहर लखलखणार

एलईडी दिव्यांनी शहर लखलखणार

स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल : ३६ कोटींचा खर्च अपेक्षित, ई-निविदा प्रक्रियेतून खरेदी
अमरावती : ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता एलईडी दिव्यांनी शहर प्रकाशमय करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. त्याकरिता ३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुणे येथील सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी पार्क या एजन्सीने डीपीआर तयार केला असून मंगळवारी त्याचे सादरीकरण झाले.
एलईडी बल्बचा वापर करण्याचे धोरण े शासनाचे आहे. त्यानुसार ऊर्जा बचत, खर्चात कपात करण्यासाठी शहरात आता एलईडी दिव्यांचा वापर केला जाणार असल्याचे आयुक्त गुडेवारांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. दरम्यान सभेत पुणे येथील ‘सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी पार्क एजन्सी’चे रानडे यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण दरम्यान नगरसेवकांना मार्गदर्शन करताना काही प्रश्नांचे निराकरण केले. प्रदीप दंदे, प्रदीप बाजड, निलिमा काळे, चेतन पवार आदींनी काही मुद्दे उपस्थित करुन एलईडी दिवे वापरामागील कारणमिमांसा जाणून घेतली. पथदिवे बंद-सुरू करण्याची प्रक्रिया स्वयंचलित असावी, असा सूर नगरसेवकांचा होता. मात्र, एलईडी बल्बचा वापर केल्यास वीज बचत, खर्चात कपात होईल, ही बाब आयुक्तांनी स्पष्ट केली. यासाठी ३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.महापालिका इमारत, पथदिवे, झोन कार्यालये, उद्याने आदी जागेवर एलईडी दिवे प्रस्तावित आहेत.

निविदेअंती ब्राण्डेड कंपन्याचे एलईडी खरेदी करणार
शहरात एलईडी दिव्यांच्या लखलखाटासाठी ब्राण्डेड कंपन्यांनी तयार केलेले दिवे खरेदी केले जातील. ही निविदा प्रक्रिया ‘ई’ पध्दतीने होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. एलईडी दिव्यांचे आयुष्य १३ वर्षांचे राहत असून त्यानुसार करारनामा केला जाणार आहे.

सव्वा दोन कोटींची वीज चोरी
महापालिकेला महिन्याकाठी पावणेदहा कोटी रुपयांचे वीज बिल येत असून यात सव्वा दोन कोटी रुपयांची वीज चोरी होत असल्याची कबुली आयुक्त गुडेवार यांनी दिली. वीज चोरी रोखण्यासाठी तसेच ऊर्जा बचतीचे धोरण लागू करण्यासाठी एलईडी दिव्यांचा वापर नितांत गरजेचा आहे, असे आयुक्त म्हणाले.

चोरी जाणाऱ्या वीज खांबांवरही चर्चा
शहरात जागोजागी विजेचे खांब पडले आहेत. मात्र, हे खांब स्थलांतरित करण्यास विलंब होत असल्याने चोरटे ते चोरुन नेत असल्याची बाब जावेद मेमन, अविनाश् मार्डीकर, मो. इमरान, दिगंबर डहाके, संजय अग्रवाल आदींनी निदर्शनास आणून दिली. नगरसेवकांच्या मागणीनुसार हे विजेचे खांब स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: The city lights up with LED lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.