सहकाऱ्याच्या गोळीबारात कारंजातील सीआयएसएफ जवानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 22:32 IST2020-01-14T22:32:29+5:302020-01-14T22:32:35+5:30
काश्मिरातील उधमपूर कॅम्पमधील घटना

सहकाऱ्याच्या गोळीबारात कारंजातील सीआयएसएफ जवानाचा मृत्यू
कारंजा: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएफ) जवानाने केलेल्या गोळीबारात दोघा जवानांचा मृत्यू झाला. त्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा गवळीपुरा येथील रहिवासी तस्लीम सलीम मुन्नीवाले या जवानाचा समावेश आहे. दरम्यान, गोळीबार करणाºया जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना १४ जानेवारी रोजी दुपारी काश्मिरातील उधमपूर सीआयएफच्या जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर सुई या गावात घडली.
सीआयएफ दलाच्या उधमपूर जिल्ह्यातील सुई या गावामध्ये युनिट क्रमांक २५१ कार्यरत असलेल्या संजय ठाकरे नावाच्या जवानाने मंगळवार १४ जानेवारी रोजी दुपारी त्याच्या सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या. त्यात संजय ठाकरे याच्यासह कारंजा येथील रहिवासी कॉन्स्टेबल तस्लिम सलीम मुन्नीवाले तसेच सहकारी कॉन्स्टेबल बी. एन.मूर्ती हे दोघे जखमी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बी. एन. मूर्ती आणि तस्लीम मुन्नीवाले यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले, तर संजय ठाकरे याची प्रकृतीही चिंताजनक आहे.
दरम्यान, संजय ठाकरे हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती आहे. तस्लिम सलीम मुन्नीवाले (३४) हा जवान मुंबई तारापूर सीआईएसएफ मुख्यालयात कार्यरत होता; मात्र तात्पुरते स्वरूपात बंदोबस्ताकरिता जम्मू-काश्मीर येथे त्यांच्या युनिटला पाठविण्यात आले होते. तस्लिम हा कारंजा येथील किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाचा माजी विद्याथी आहे. तो सन-२००८ मध्ये सीआयएसएफमध्ये दाखल झाला होता.
माझा भाऊ तस्लीम मुन्नीवालेची काश्मिरमधील उधमपूर जिल्ह्याच्या कॅम्पमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बंदोबस्तासाठी नियुक्ती झाली होती. सहकारी जवानाने गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची माहिती सीआयएसएफच्या कॅम्पमधून सांयकाळच्या सुमारास मिळाली.
-हनीफ मुन्नीवाले