चिंचोलीत ग्रामसभेआधी ग्रामसेवकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:41+5:30
शिवीगाळ करुन गुणवंत मानकर यांनी आपल्याला मारहाण केली तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून कार्यालयातील खुर्ची तोडली, अशी तक्रार उईके यांनी सकाळी ११.४५ च्या सुमारास पोलीस ठाण्यात नोंदविली.

चिंचोलीत ग्रामसभेआधी ग्रामसेवकास मारहाण
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ जानेवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास विशेष ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच ग्रामसचिव व ग्रामस्थ यांच्यात हाणामारी झाली. ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, ग्रामपंचायत आवारात झेंडावंदन झाल्यानंतर ग्रामसेवक रमेश उईके (५०), कर्मचारी नंदकिशोर वसू, कमलेश खंडारे, प्रमोद आंबडकर हे कार्यालयात कामकाज करीत असताना गुणवंत तुळशीराम मानकर (४५) हे आले. घरकुल व स्वच्छतागृहाच्या अर्जाबाबत त्यांनी ग्रामसेवकाला विचारणा केली. त्यावर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
शिवीगाळ करुन गुणवंत मानकर यांनी आपल्याला मारहाण केली तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून कार्यालयातील खुर्ची तोडली, अशी तक्रार उईके यांनी सकाळी ११.४५ च्या सुमारास पोलीस ठाण्यात नोंदविली.
प्रत्यक्षदर्शीनुसार, महामानवांच्या प्रतिमांचे नुकसान झाल्याचे घटनास्थळी दिसून आले. या घटनेने काही वेळाकरिता गावात तणावाचे वातावरण होते. रहिमापूर पोलिसांनी गुणवंतविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, ४२७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला सोमवारी अंजनगाव सुर्जी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील दिनेश वाकोडे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने गुणवंतची रवानगी अमरावती येथील कारागृहात केली.
घटनेमागील वास्तव वेगळेच
गुणवंत मानकर हे पाच महिन्यांपासून ग्रामसेवक रमेश उईके यांच्याकडे स्वत:च्या जागेवर घरकुल आणि स्वच्छतागृहासाठी दिलेल्या अर्जाची सद्यस्थिती काय, याची माहिती मागत होते. पण, अंतर्गत राजकारणामुळे प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे मानकर यांनी ते पाऊल उचलल्याची चर्चा गावात रंगली आहे.
ग्रामसेवक रमेश उईके यांच्या तकारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
- जमील शेख, ठाणेदार, रहिमापूर