ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 6, 2015 00:15 IST2015-10-06T00:15:30+5:302015-10-06T00:15:30+5:30
विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून येथील एका दोन वर्षीय बालकाचा करुण अंत झाला.

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
दर्यापुरातील घटना : टाटानगरात शोककळा, मृतदेह उचलण्यास नकार
दर्यापूर : विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून येथील एका दोन वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. ही घटना सोमवारी दुपारदरम्यान येथील टाटानगर परिसरात घडली. ट्रॅक्टरचालकाला अटक होत नाही. तोपर्यंत बालकाचा मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका मृत बालकाच्या वडिलांनी घेतल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आदित्य श्रीकृष्ण मालवे (२ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. आदित्य घराच्या अंगणात मोठी बहीण प्राचीसह खेळत होता. दरम्यान आदित्यसाठी त्याची आजी खाऊ आणण्यासाठी गेली असता विटा ट्रॅक्टर एम.एच.२७ बी-बी- ०२४५ या ट्रॅक्टरच्या चाकात आदित्यचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
उपजिल्हा रुग्णालयात गर्दी
दर्यापूर : घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती आदित्यच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी आक्रोश केला. दर्यापूरचे ठाणेदार जे.के. पवार यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
पोटच्या गोळ्याचा असा विदारक अंत झाल्याने शोकसंतप्त अवस्थेतील आदित्यचे वडील श्रीकृष्ण मालवे यांनी ट्रॅक्टरचालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू न देण्याची भू्मिका घेतली. परिणामी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. चालकाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी नातेवाईकांना दिल्यानंतरच चिमुरड्या आदित्यचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. हे ट्रॅक्टर नंदकिशोर कोकदे यांच्या मालकीचे असल्याचे कळते. आरोपीविरुध्द पोलिसांनी ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आदित्य मालवे या निरागस बालकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच दर्यापूरकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. परिसरात बघ्यांची गर्दी उसळळी होती. राजेंद्र राजगुरे, सुनील पानझाडे, प्रदीप मलीये आदींसह अनेक नेत्यांनी शोकविव्हळ मालवे कुटूंबाचे सांत्वन केले.