पीएसपीएस कंपनीचा प्रमुख अटकेत

By Admin | Updated: August 7, 2014 23:28 IST2014-08-07T22:04:20+5:302014-08-07T23:28:24+5:30

लाखो रुपयांचे आमिष दाखवून जनतेला गंडा घालणार्‍या पीएसपीएस कंपनीचा प्रमुख व एका संचालकाला पोलिसांनी अटक केली

The chief of the PSPS company is arrested | पीएसपीएस कंपनीचा प्रमुख अटकेत

पीएसपीएस कंपनीचा प्रमुख अटकेत

देऊळगावराजा : लाखो रुपयांचे आमिष दाखवून जनतेला गंडा घालणार्‍या पीएसपीएस कंपनीचा प्रमुख रवींद्र भागोराव डांगे व कंपनीच्या आणखी एका संचालकाला देऊळगावराजा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेच्या कारवाईनंतर अधिक तपासासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. करोडो रुपयांचा अपहार करणार्‍या या कंपनीमध्ये देऊळगावराजा तालुक्यातील जनतेचे जवळपास एक कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यभरामध्ये केबीसी घोटाळा गाजत असताना मराठवाड्यातील परभणी शहरात पीएसपीएस मल्टीस्टेट सर्व्हिसेस प्रा.ली.ही कंपनी उदयाला आली. परभणी शहरात सरगम कॉलनीमध्ये राहणारा रवींद्र भागोराव डांगे (वय ५0) हा या कंपनीचा निर्माता असून, त्याच्या सुपीक डोक्यातून निष्पाप लोकांना गंडवणार्‍या कल्पना समोर आल्या. हजारो रुपयांची गुंतवणूक करा, अल्पावधीत लाखो रूपये मिळवा, ही योजना एजंटांच्या माध्यमातून गावागावात पोहोचली. पैशाच्या लालसेपायी अनेकजण यात फसल्या गेले. मराठवाडा आणि विदर्भात या कंपनीचा विस्तार वाढला. करोडो रूपये कंपनीत जमा झाले. एकट्या देऊळगावराजा तालुक्यातून अंदाजे एक कोटी रूपये कंपनीने उकळले आहेत. दामदुप्पट रक्कम मिळण्याची दिवास्वप्ने पाहत असताना केबीसी घोटाळा उघड झाल्यानंतर गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली; पण त्याउपरही कंपनीने विश्‍वास दाखवल्यावर अनेक नवीन लोकांनी यात पैसे गुंतवल्याचा प्रकार समोर आला. पीएसपीएस कंपनीने लोकांना जे धनादेश दिले होते तेही एजंटांच्या माध्यमातून परत घेत तुम्हाला रोख रक्कम आणून देतो, असे सांगितले होते. पैशाच्या लालसेपायी अनेकांनी ते धनादेश परत केल्याने त्यांची पुर्णत: फसगत झाली असून आता कंपनीने गाशा गुंडाळण्यास सुरूवात केली. केबीसीप्रमाणेच पीएसपीएस या कंपनीचेही स्वरूप समोर आल्याने गुंतवणूकदारामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दरम्यान या कंपनीचा मुख्य संचालक रवींद्र भागोराव डांगे विरोधात परभणी येथे गुन्हा दाखल झाला. तर त्याच अनुषंगाने देऊळगावराजा पो.स्टे.मध्ये फसवणूक झालेल्या डिगांबर साळुबा कोल्हे रा.तुळजापूर यांनी कंपनी एजंट समाधान दामोधर मोरे विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामधील मुख्य आरोपी रवींद्र भागोराव डांगे, संचालक अशोक प्रभाकर गायकवाड हे दोघे जण फरार होते. त्यांना रत्नागिरी येथून अटक केली होती. ५ जुलै रोजी परभणी कोर्टात हजर केल्यानंतर दे.राजा पोलिसांनी तिथे हजर राहून तपासासाठी आरोपी मिळण्याची केलेली मागणी मान्य करत न्यायालयाने दोन्ही आरोपींना ताब्यात दिले. दे.राजा न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार हिवाळे, पोकाँ पंजाबराव साखरे करत असून, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पोलिस बयाण घेत आहेत. कंपनीचा म्होरक्याच पोलिसांच्या ताब्यात आल्याने देऊळगावराजा तालुक्यात पीएसपीएस कंपनीचे एजंट म्हणून काम करणार्‍या एजंटांचेही धाबे दणाणले आहेत.

** गुंतवणूकदारांना सहा कोटींचा गंडा

पीएसपीएस या कंपनीच्या घोटाळ्यात चक्रावून टाकणारे आकडे समोर येत असून, दे.राजा तालुक्यातून अंदाजे एक कोटी रुपये गुंतवणूक झाल्याची माहिती होती; मात्र आतापर्यंत झालेल्या तपासाच्या आधारे हा आकडा चक्क सहा कोटीच्या घरात पोहोचला आहे. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. परभणी शहरातील सरगम कॉलनीत राहणार्‍या रवींद्र भागोराव डांगे या ५0 वर्षीय व्यक्तीने डिसेंबर २0१३ मध्ये सुरु केलेल्या पीएसपीएस मल्टीट्रेड सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीचे दामदुप्पट, तिप्पट रकमेच्या लालसेला बळी पडून एजंटाच्या माध्यमाने लाखो ,करोडो रुपयांची गुंतवणूक केली होती; मात्र अवघ्या सहा महिन्यांच्या काळातच या कंपनीला शेवटच्या घटका मोजाव्या लागल्याने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक होऊन तोंडचे पाणी पळाले. यासंदर्भात परभणी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी रवींद्र डांगे, संचालक अशोक प्रभाकर गायकवाड यांना रत्नागिरी येथे पोलिसांनी अटक केली. तेथील पोलिसांनी तपासात प्राप्त माहितीवरुन प्रॉपर्टी सील करण्याचे कारवाई केली. देऊळगावराजा पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल असल्याने अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. शिवाय त्यांना देऊळगावराजा न्यायालयाने ८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांचा दोन दिवसांचा तपास प्रगतीपथावर असून, आतापर्यंत ६७ जणांनी सक्षम पुरावे सादर केल्याने त्या सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले. प्राथमिक अंदाज एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा होता. त्यात आता मोठी भर पडून हा आकडा सहा कोटीपर्यंत गेला आहे. ६७ जणांचे बयाण घेताना पोलिसांनी कंपनीकडून देण्यात आलेले धनादेश बँकेचा टर्नओव्हरची कागदपत्रे तपासाच्या दृष्टीने ताब्यात घेतली आहेत. आरोपी रवींद्र डांगे आणि अशोक गायकवाड यांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपत असली तरी दोन दिवसात या घोटाळ्याबाबत जी माहिती आरोपींनी दिली, त्यानुसार आरोपी व त्यांच्या नातलगांच्या नावावर असलेली उर्वरित मालमत्ता जप्त करण्यासाठी आरोपींची शुक्रवारी पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी तपासी पो.काँ.पंजाबराव साखरे यांनी दिली आहे.

** गुंतवणूकदारांची पोलिस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी रीघ

गेल्या दोन दिवसांपासून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पो.स्टे.ला रीघ लागली असून, पोलिस सक्षम कागदपत्रांच्या आधारे त्यांचे बयाण नोंदवून घेत आहेत. दे.राजा तालुक्याचा आकडा सहा कोटींवर गेला असल्याने शहर तसेच तालुक्यातून शेकडो गुंतवणूकदारांचा यात समावेश आहे. पीएसपीएस या कंपनीमध्ये आकर्षक योजना दामदुप्पट तिप्पटला बळी पडून बयाण नोंदवलेल्या ६७ जणांच्या व्यतिरिक्त अजूनही काही गुंतवणूकदार असतील तर त्यांनी कंपनीकडून प्राप्त झालेले धनादेश बँकेचा टर्न ओव्हरची प्रत वा सक्षम पुरावे सादर करुन दे.राजा पो.स्टे.शी तत्काळ संपर्क साधावा, जेणे करुन यांचे बयाण नोंदवता येईल, असे आवाहन तपास अधिकारी ठाणेदार हिवाळे यांनी केले आहे.

Web Title: The chief of the PSPS company is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.