अल्पावधितच गुंडाळली मुख्यमंत्री पेयजल योजना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:55+5:30
नवीन कामांचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचनाच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून न आल्यामुळे ही योजना पूर्णत: बंद झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे. जुनीच कामे कशीतरी पूर्ण करून या योजनेची फाईल बंद करण्याच्या सूचना मंत्रालय पातळीवरून आल्या असल्याची माहिती आहे.

अल्पावधितच गुंडाळली मुख्यमंत्री पेयजल योजना!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संपूर्ण राज्य टँकरमुक्त करण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री पेजल योजना लवकरच गुंडाळली जाणार आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जीवन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती गावकऱ्यांनसाठी शुद्ध पाण्याचे उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरू केली होती. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच काम पूर्ण करून ही योजना बंद करण्यात आली आहे.
नवीन कामांचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचनाच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून न आल्यामुळे ही योजना पूर्णत: बंद झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे. जुनीच कामे कशीतरी पूर्ण करून या योजनेची फाईल बंद करण्याच्या सूचना मंत्रालय पातळीवरून आल्या असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेला ही योजना लागू करावी, यासंदर्भात शासनाने सन २०१७ मध्ये आदेश दिले होते. त्यानंतर गावांची निवड करून ग्रामपंचायत ठरावाची यादी पाणीपुरवठा मंत्रालयाला पाठवायची होती. मात्र, या निवडीत वर्ष लोटले. त्यामध्ये जिल्ह्यातील ९ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये नऊच कामांचा समावेश करण्यात आला होता. मुख्यमंत्री पेयजल योजनेतील मोठ्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्याचे ठरले. मंजूर असलेल्या कामाला सुरुवात झाली. या सर्व प्रकाराला सन २०१९ चा मुहूर्त निघाला. ठरवून दिलेल्या कालावधीत योजना पूर्ण करायच्या होत्या. यादीतील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वकनाथ, धारणीतील कुटंगा, चांदूर बाजारमधील विश्रोळी येथील योजनेचे ५० टक्केच कामे झाली आहेत. वरूडमधील बेनोडा, लोणी, नांदगावमधील बेलोरा हिरापूर येथील योजना ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत. धारणीमधील बेरदा बर्डा, अचलपूरमधील खेलतापमाळी, धामणगाव रेल्वेमधील कावली वसाड येथील योजना पूर्ण झाल्या आहेत. काही योजना पूर्ण झाल्या असल्या तरी वीजजोडणीअभावी सुरू झालेल्या नाहीत. त्या लवकरच सुरू होतील, असे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यातील काही कामे शिल्लक राहिली ती पूर्ण करून या योजनेला ब्रेक लाण्याची तयारी संबंधित विभागाने चालविली आहे. सुरुवातीला काही कामे पूर्ण झालीत. मात्र, यातही निधी मिळण्यास विलंब आणि तांत्रिक गुंतागुंतीमुळे कामे पूर्ण करण्यास होणारा विलंब यामुळे ही योजना बंद करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री पेयजल योजनेत कामे मंजूर केली जात नसली तरी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी ५० टक्के हिस्स्यातून मिळणाºया निधीतून मंजूर केली जात आहे.
सध्या मुख्यमंत्री पेयजल योजनेत कामे मंज़ूर केली जात नसून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर केली जात आहेत. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के हिस्सा याप्रमाणे निधी मिळत आहे.
- राजेंद्र सावळकर,
कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा