कृषी विभागाकडून रासायनिक खत बचतीची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST2021-05-07T04:14:16+5:302021-05-07T04:14:16+5:30
अमरावती : येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी कृषी विभागाकडून खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात ...

कृषी विभागाकडून रासायनिक खत बचतीची मोहीम
अमरावती : येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी कृषी विभागाकडून खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.
पिकांच्या अन्नद्रव्यांसाठी केवळ रासायनिक खतांवरच अवलंबून न राहता जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, नाडेप खत, बायोडायनामिक कंपोस्ट, हिरवळीचे खत वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे जमीनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मात सुधारणा होते. अन्नद्रव्यांची उपलब्धता व उपयुक्तता वाढते. रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी व केएसएम यासारखे जीवाणू संवर्धके किंवा जीवाणू संघ प्रत्येक पिकात शिफारशीप्रमाणे बीज प्रक्रियेसाठी वापरल्यास रासायनिक खतांच्या वापरात बचत होते, असे चवाळे म्हणाले.
पिकांना आवश्यक अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी खतांची बाजारातील उपलब्धता, सद्यस्थितीतील किमतीनुसार येणारा खर्च, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खतमात्रा आदी बाबींचा विचार करणे गरजेचे असते. माती परीक्षणानुसार किंवा जमीन सुपिकता निर्देशांकानुसार खतांचा वापर केल्यास शिफारशीत खत मात्रा व जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता यांची सांगड घालून द्यावयाच्या प्रत्यक्ष खताची मात्रा तयार करता येते. शेतकऱ्यांनी एकाच प्रकारच्या खतांचा वापर करण्याऐवजी बाजारातील उपलब्धता, खर्च व शिफारस या बाबींचा विचार करून रासायनिक खताची निवड करावी जेणेकरून ठराविक खतांच्या अतिवापरावरील ताण कमी होईल व बाजारात उपलब्ध असलेल्या विविध खतांच्या पर्यायी वापराला चालना मिळेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी असंतुलित व मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर टाळावा व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांनी केले.
खत बचतीच्या विशेष मोहिमेत गावागावांतून कार्यशाळा, ऑनलाईन कार्यक्रम आदींद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कोट
सोयाबीन, कापूस, ज्वारी या प्रमुख पीकांसाठी रासायनिक खतांचा मोठा वापर होतो. तो अनेकदा असंतुलित असतो. त्यामुळे आवश्यक प्रमाणात खताची मात्रा पिकांना मिळत नाही. त्यामुळे पीकाचा उत्पादन खर्च वाढतो व निव्वळ उत्पन्न कमी होते. त्यामुळे कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार खत मात्रांचा अवलंब शेतकरी बांधवांनी करावा.
- जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे