चेकिंग चालू है, कोरोना आलाय... म्हणत १५ हजार रुपये लांबविले
By प्रदीप भाकरे | Updated: December 28, 2023 13:51 IST2023-12-28T13:51:14+5:302023-12-28T13:51:31+5:30
मोरले हे त्यांच्या मित्राला भेटण्याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय ‘पीडीएमसी’त जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांना रूग्णालयासमोरच अडविले.

चेकिंग चालू है, कोरोना आलाय... म्हणत १५ हजार रुपये लांबविले
अमरावती: मास्क नही लगाया, यहॉ चेकिंग चालू है, बडा अधिकारी हू, मुझे आपकी तलाशी लेनी होगी, अशी बतावणी करून एका ६८ वर्षीय वृध्दाला १५ हजार रुपयांनी लुटण्यात आले. २७ डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास पंचवटीस्थित पीडीएमसी रूग्णालयासमोर ही घटना घडली. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी श्रावण बाळकराम मोरले (६८, रा. मासोद, ता.मुलताई, जि. बैतूल) यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
मोरले हे त्यांच्या मित्राला भेटण्याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय ‘पीडीएमसी’त जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांना रूग्णालयासमोरच अडविले. तथा तुम्ही मास्क लावलेला नाही. कोरोना परत येत आहे, आम्ही त्यासाठीच तपासणी सुरू केली आहे. मोठे अधिकारी देखील तपासणी करत आहेत. मला देखील तुमची तपासणी करावी लागेल, अशी बतावणी केली.
त्या अज्ञात आरोपीने मोरले यांच्या कपड्यांची झडती घेतली. तथा हातचलाखी करून मोरले यांच्या बनियानच्या खिशामधून १५ हजार रुपये रोख काढून घेतली. क्षणातच तो तेथून रफुचक्कर झाला. दरम्यान, खिशातील पैसे त्या अज्ञात भामटयाने लांबविल्याचे लक्षात येताच मोरले यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी, रात्री ८.१७ च्या सुमारास अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.