गावागावांतील पाण्याची पातळी तपासा
By Admin | Updated: March 5, 2017 00:13 IST2017-03-05T00:13:41+5:302017-03-05T00:13:41+5:30
उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी.

गावागावांतील पाण्याची पातळी तपासा
पालकमंत्री : पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभा
अमरावती : उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक जाणवते. मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर भूजल सर्वेक्षण विभाग व नागरिकांच्या सहायाने पाण्याची पातळी तपासावी. पाणीटंचाई निवारणासाठी संबंधित विभागाने सुनियोजित उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीत दिले.
संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जि.प. सदस्य रवींद्र मुंदे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, धारणीचे प्रकल्प अधिकारी षणमुगराजन, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी के.टी. तुमाळकर, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती जाणून घेतली. नांदगाव खंडेश्वर येथील पाळा व दाभा या गावांमध्ये होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना करताना पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी परीक्षण करावे, असे सांगितले. पाणी शुध्दीकरणाच्या प्रक्रियेस विलंब होऊ शकतो त्यावर त्वरित उपाय म्हणून जिल्हा नियोजन योजनेच्या प्रस्तावित निधीतून नवीन पाईप जोडणी करावी, असे त्यांनी सांगितले. वीज देयके वेळेत न भरल्यामुळे पंपाने पाणीपुरवठा करण्याबाबतच्या समस्येवर तसेच विहीर अधिग्रहणाबाबतच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी. नवीन विंधन विहिरीचे काम त्वरित पूर्ण करावे आणि अधिग्रहित विहिरींवर सौरपंप लावण्याबाबतचे नियोजन करावे, असेही निर्देश श्री पोटे यांनी दिले.
पालकमंत्री म्हणाले, नांदगाव खंडेश्वर येथे आवश्यक त्या ठिकाणी सिंचन विहिरींबाबत प्रस्ताव सादर करावा. चिखलदरा येथे १४ गावे पाणीटंचाईग्रस्त असून तेथे डिसेंबर, मार्च व जून अशा तीन टप्प्यांमध्ये विशेष नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खंडेमल गावाचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गाव म्हणून समावेश होऊ शकतो, तर आवागड येथे पाणीपुरवठा योजना सुरू असल्याबाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली. मोर्शी तालुक्यातील येरला गावातील पाण्याचा पाईप जोडणी करण्याबाबत, वरूड तालुक्यात विजदेयक न भरल्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत समस्या निर्माण झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत, अचलपूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार योजनेमध्ये प्रामुख्याने समावेश करावा आणि सौरउजेर्चा कृषिपंप उपयोगात आणून पाण्याचा प्रश्न मिटवावा, असे निर्देश त्यांनी दिले. चांदूररेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथे पाण्याच्या बिकट समस्येवर मात करण्यासाठी पाच ठिकाणी सिंचन विहिरींची कामे सुरू असल्याची माहिती संबंधित गटविकास अधिकारी यांनी दिली. यावेळी कृत्रिम पाणीटंचाईवरदेखील चर्चा करण्यात आली. धामणगाव रेल्वे, तिवसा, अमरावती, दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी या तालुक्यांचा आराखडा सादर करण्यात आला असून प्रथम टप्प्यात पाणीटंचाई नसल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)