शाळांच्या प्रवेशात बदल्यांनी केला घोळ
By Admin | Updated: June 15, 2014 23:17 IST2014-06-15T23:17:12+5:302014-06-15T23:17:12+5:30
जिल्ह्यात नर्सरी व पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. त्यातच शासकीय बदल्यांमुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता शहरातील शाळांमध्ये पायपीट करावी

शाळांच्या प्रवेशात बदल्यांनी केला घोळ
अमरावती : जिल्ह्यात नर्सरी व पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. त्यातच शासकीय बदल्यांमुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता शहरातील शाळांमध्ये पायपीट करावी लागत आहे. काही शाळा व्यवस्थापनाच्या आरक्षण कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यात १५० च्यावर नर्सरी शाळा असून त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी विविध शासकीय शाळा व खासगी शाळांमध्ये प्रवेशाकरिता अर्ज केले आहे. तसेच इयत्ता पाचवीचा प्रवेश ‘ड्रा’ पध्दतीने होत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मागील वर्षात जिल्ह्यामध्ये २७५४ मान्यताप्राप्त शाळांमधून इयत्ता १ ते ५ च्या सुमारे २ लाख ३५ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा प्रवेश प्रक्रिया सुरु असून या संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये शासकीय, खासगी शाळा व मंडळाचा सहभाग आहे. तसेच ६ ते ९ वीपर्यंत १ लाख ५२ हजार ८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २६ जून रोजी शाळा सुरु होणार असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. नर्सरी स्कुलमधील बहुतांश प्रवेश प्रक्रिया संपत आल्या असून फक्त ५ वीच्या प्रवेशाची पालक आता प्रतीक्षा करीत आहेत. यंदा ‘ड्रा’ पद्धतीने पाचवीचे विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहेत. त्यामुळे अनेक पालकांनी विविध शाळांमध्ये पाल्ल्याचे अर्ज दाखल केले आहे. येत्या १७ तारखेला ५ वीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला ‘ड्रा’ शाळा व्यवस्थापनाकडून उघडण्यात येणार आहे. ‘ड्रा’ पद्धतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने दिलेल्या कोट्यानुसार शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये फक्त बदली होऊन आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बदलीहून आलेल्या पालकांच्या पाल्ल्याचा प्रवेश प्रक्रियेत कोणताही विचार केला गेला नाही. त्यामुळे पालकांची प्रवेशकरिता तारांबळ उडत आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा याकरिता शाळा व्यवस्थापनाच्या कोट्यातून प्रवेश देण्याचे शाळा व्यवस्थापनाने ठरविले आहे. त्यामुळे बदल्याहून आलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.