हवामान बदलतेय, पीक पद्धतीही बदला
By Admin | Updated: July 6, 2015 00:18 IST2015-07-06T00:18:09+5:302015-07-06T00:18:09+5:30
कोरडवाहू पीक पद्धतीमध्ये पावसाचा मुख्य ‘रोल’ आहे. किंबहुना मान्सून व पावसाच्या सुरुवातीच्या १०० दिवसांत खरिपाचे यशापयश अवलंबून असते.

हवामान बदलतेय, पीक पद्धतीही बदला
खरीप २०१५ : कोरडवाहूमध्ये आंतरपीक घेणे गरजेचे
गजानन मोहोड अमरावती
कोरडवाहू पीक पद्धतीमध्ये पावसाचा मुख्य ‘रोल’ आहे. किंबहुना मान्सून व पावसाच्या सुरुवातीच्या १०० दिवसांत खरिपाचे यशापयश अवलंबून असते. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेची शाश्वती व स्थिरता आणण्याच्या दृष्टिकोनातून व कोरडवाहू हंगाम फायदेशीर ठरण्याच्या दृष्टीने आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.
दरवर्षी हवामान व पावसाची अनिश्चितता आहे. हवामान बदलत असताना पीक पद्धतीही बदलने गरजेचे आहे. प्रामुख्याने आंतरपीक पद्धतीचा अवलंब महत्त्वाचा आहे. कमी पावसाच्या भागात व प्रामुख्याने हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीमध्ये कमी कालावधीची पिके घेणे व वाणांची निवड करणे महत्त्वाचे आहे. मूग, उडीद तसेच अधिक पावसाच्या भागात जमिनीवर जलदपणे पसरुन वाढणारी कमी उंचीची पिके आंतरपीक म्हणून व जमिनीची धूप वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरतात.
हलकी ते मध्यम जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करणारी भूईमूग, मूग, उडीद, सोयाबीन अशा पिकांचा आंतरपीक म्हणून अवलंब करणे महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीची सुपिकता वाढून सूक्ष्मजिवांची संख्या यात वाढत होते. मुख्य पीक व आंतरपीक यांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये वाढणारी असावीत. कपाशीची मुळे मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्ये व पाणी शोसून घेतात. आंतरपीक म्हणून मूग, उडीद पिकांची मुळे जमिनीच्या वरच्या स्थरातून पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात. मुख्य पिके व आणि आंतरपीक एकमेकांना पूरक अशी निवडणूक जास्त उत्पादन देणारी ठरतात. अधिक अन्नद्रव्याची गरज असणाऱ्या पिकांचा आंतरपीके म्हणून समावेश टाळणे महत्त्वाचे आहे.
हवामानात होणारा बदल शेतीपिकांवर विपरित परिणाम करतो. पावसात खंड व दररोज वाढणारे तापमान बिजांकुरावर व रोपावर परिणाम करतो, यासाठी पावसाचे व्यवस्थापन व आंतरपीक पद्धतीचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
आंतरपीक पद्धतीचे व्यवस्थापन
मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप, ज्वारी व सोयाबीन आदी पिके घ्यावीत. मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन व खरीप ज्वारी घ्यावीत. हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, एरंडी आदी पिके घ्यावीत. लवकर पक्वहोणाऱ्या वाणाची निवड करावी. दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्टरी रोपांची, झाडांची संख्या योग्य ठेवावी. पेरणीसाठी रुंद वरंबा, सरी पद्धतीचा अवलंब केल्यास पावसाच्या पाण्याचे संवर्धन होते.
आंतरपीक पद्धतीचे फायदे
सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्याची हमी असते.
पट्टा पेर पद्धतीमध्ये एक पीक तृणधान्य व एक कडधान्य घेतल्यास जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते
कडधान्य वर्गातील मूग, उडीद, तूर किंवा सोयाबीन यासारखी पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जिवाणू वातावरणातील नत्र जमिनीतून पिकांसाठी उपलब्ध करुन देतात. या पिकांची पानगळ व अवशेष यामुळेही जमिनीची सुपिकता न सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
असे असावे आंतरपीक
ज्वारी अधिक तूर
ज्वारी अधिक तूर ही आंतरपीक पद्धती ३:३ किंवा ४:२ ओळीच्या प्रमाणात कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. ज्वारीचे पीक ११० दिवसांत काढल्यानंतर ज्वारीच्या पाटातील ओलावा अन्नद्रव्य तुरीच्या पिकास उपलब्ध होते. मोकळी हवा व सूर्यप्रकाश यामुळे तुरीच्या सलग पिकापेक्षा आंतरपीक पद्धतीतील तुरीचे पीक अधिक चांगले येऊन अधिक उत्पादन मिळते.
सोयाबीनमध्ये
तुरीचे आंतरपीक महत्त्वाचे
जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र सोयाबीनचे आहे. सोयाबीन हे सलग प्रमाणात घेण्यात येते व काढणीनंतर रबीचा गहू व हरभरा पिके घेता येतात. कोरडवाहू क्षेत्रात जिथे कमी पाऊस पडतो अशा क्षेत्रात सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेणे महत्त्वाचे ठरते. सोयाबीनच्या दोन किंवा चार ओळीनंतर तुरीची ओळ पेरावी. यामध्ये तुरीची वाढ झाल्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत कीटकनाशकांची फवारणी करणे सोईचे होते. ही पेरणी जुलैच्या १५ तारखेपर्यंत करता येते. सोयाबीनची काढणी सप्टेंबर किंवा आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत करता येते. त्यानंतर तुरीची वाढ चांगली होऊन भरपूर बहर व शेंगा येतात. पावसाच्या खंडानंतर एक पीक वाया गेल्यास दुसऱ्या पिकाचा फायदा मिळतो.
कापूस अधिक मूग
कापूस पिकात मूग, उडीद यासारखी पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. कापसाच्या बीटी वाणासाठी ९० बाय ६० से.मी. आणि ९० बाय ९० से.मी. अंतरावर शिफारस केली आहे. कापसाच्या दोन ओळीमध्ये टोकन करून उडदाचे किंवा मुगाचे आंतरपीक घेता येते.
कापसात तुरीचे आंतरपीक नको
पारंपरिक पद्धतीत कापसात तुरीचे आंतरपीक घेतले जातात. कापसाच्या सहा ते आठ ओळीनंतर तुरीच्या दोन ओळी पेरण्यात येतात. वास्तविकत: कापूस व तूर ही दोन्ही उंच वाढणारी विस्तारणारी आणि दीर्घ (१६० ते १८० दिवस) कालावधीची पिके असल्याने व सूर्यप्रकाश, ओलावा, अन्नद्रव्याच्या गरजा एकसारख्या असल्याने ही पिके एकमेकास पूरक न ठरता स्पर्धक ठरतात. एवढेच नव्हे तर त्यावर पडणाऱ्या किडीदेखील सारख्याच आहेत. त्यामुळे आंतरपीक म्हणून घेणे फायद्याचे ठरते.