चांदूरबाजार पालिकेला नव्या नगराध्यक्षाचे वेध

By Admin | Updated: July 7, 2014 23:21 IST2014-07-07T23:21:55+5:302014-07-07T23:21:55+5:30

स्थानिक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने तहसीलदार शरद गावंडे यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला आहे. जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत नव्या नगराध्यक्षाची निवडणूक

Chandurbazar Municipal Corporation | चांदूरबाजार पालिकेला नव्या नगराध्यक्षाचे वेध

चांदूरबाजार पालिकेला नव्या नगराध्यक्षाचे वेध

सुरेश सवळे - चांदूरबाजार
स्थानिक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने तहसीलदार शरद गावंडे यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला आहे. जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत नव्या नगराध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक नगरसेवकांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
चांदूरबाजारसह जिल्ह्यातील इतर आठ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ २७ जून रोजी संपला. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करून या नगराध्यक्षांना मुदतवाढ दिली होती. या विरोधात काही नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे राज्य शासनाने पुन्हा आपला निर्णय रद्द करून निवडणूक घेण्याचे ठरविले आहे.
दरम्यान गुरूवारी शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेनुसार नगराध्यक्षांची मुदत ४ जुलैपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे स्थानिक तहसीलदारांना नगराध्यक्षांना पदभार सांभाळण्याचे आदेश दिले. त्यानुसार नव्या नगराध्यक्षांची निवड होईपर्यंत तहसीलदारच या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
जुलैच्या शेवटपर्यंत नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांमध्ये याबाबत चर्चा रंगू लागली आहे. येथील मावळते नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठीच आरक्षित असल्याने या पदावर सरोज हरणे यांची सर्वानुमते निवड झाली होती. त्यांनी त्यांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर आता पुन्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. पुढच्या अडीच वर्षांसाठी हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
या पालिकेत सत्तारूढ प्रहार गटाचे १० नगरसेवक असल्यामुळे त्यांचे पूर्ण बहुमत आहे. शिवाय त्यांच्याकडे पाच महिला सदस्य आहेत. विरोधी गटात राष्ट्रवादी चार, भाजप एक, काँग्रेस एक, अपक्ष १ असे सात बलाबल आहे. यात राष्ट्रवादीकडे ३ तर भाजपकडे १ महिला सदस्य आहे. सत्तारूढ गटाचा विचार करता सत्तारूढ गटातील शिक्षण व आरोग्य सभापती शुभांगी देशमुख, महिला व बालकल्याण सभापती मनीषा नांगलिया, सुुनीता गणवीर या नगरसेविका नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
विरोधी गटाकडून सध्या राष्ट्रवादीच्या मीनाक्षी औतकर यांची नगराध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. दुुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या सोबतच्या नगरसेविका सुषमा बर्वे यांचे निकटचे संबंध लक्षात घेता त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, प्रहारचे बहुमत पाहता नगराध्यक्षपद प्रहारच्याच वाट्याला येते की काय,
अशी स्थिती दिसून येत आहे. एकूणच परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ऐनवेळी जुळून येणाऱ्या राजकीय समीकरणांवरच चांदूरबाजारचे नगराध्यक्षपद कोणाच्या वाट्याला येणार, हे ठरणार असल्याने चर्चांना उत आला आहे.

Web Title: Chandurbazar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.