चणा पहिल्यांदा पाच हजार पार; आवक कमी, नाफेडच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांजवळ साठवणूक नाही
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 18, 2023 16:45 IST2023-07-18T16:45:01+5:302023-07-18T16:45:53+5:30
गतवर्षीच्या रब्बी हंगामात जमिनीत आर्द्रता जास्त असल्याने जिरायती हरभऱ्याचे बंपर उत्पादन

चणा पहिल्यांदा पाच हजार पार; आवक कमी, नाफेडच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांजवळ साठवणूक नाही
अमरावती : रब्बी हंगामापूर्वीच हरभऱ्याचे भावात मोठ्या प्रमाणात कमी आलेली होती. क्विंटलमागे ४८०० या दरावरच हरभरा स्थिरावला असतानाच आठ दिवसांपासून पाच हजाराचा आकडा हरभऱ्याने पार केलेला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांजवळ साठवणूक नसल्याने बाजार समित्यांमध्ये आवक कमी झालेली आहे.
गतवर्षीच्या रब्बी हंगामात जमिनीत आर्द्रता जास्त असल्याने जिरायती हरभऱ्याचे बंपर उत्पादन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर हरभऱ्याचे भाव पाच हजाराचे आत होते. हरभऱ्याचा हमीभाव ५३३५ रुपये असतांना त्यापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांची लूट होत असल्याने नाफेडद्वारा हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओघ शासन खरेदीकडे होता. तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ संपल्यानंतर शेतकऱ्यांना हरभरा बाजार समितीत विकल्याशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे पुन्हा आवक वाढून हरभऱ्याचे भावात घसरण झाली होती.