आठ दिवसांत पीककर्ज वाटपाचे बँकांना ‘आव्हान’

By Admin | Updated: June 23, 2015 00:42 IST2015-06-23T00:42:21+5:302015-06-23T00:42:21+5:30

खरीप हंगामास सुरुवात झाली आहे. बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची नितांत गरज आहे.

'Challenge' to banks for allocation of crop loans in eight days | आठ दिवसांत पीककर्ज वाटपाचे बँकांना ‘आव्हान’

आठ दिवसांत पीककर्ज वाटपाचे बँकांना ‘आव्हान’

शासनाचा दबाव : उद्दिष्टांच्या ४१ टक्केच झाले वाटप, शेतकऱ्यांची कोंडी
गजानन मोहोड अमरावती
खरीप हंगामास सुरुवात झाली आहे. बी-बियाणे, खतांसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची नितांत गरज आहे. सद्यस्थितीत बँकांनी उद्दिष्टांच्या ४१ टक्केच कर्जवाटप केले आहे. बँका शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याने शासनाने बँकांवर दबाव वाढविला असून १०० टक्के कर्जवाटपासाठी ३० जून ‘डेडलाईन’ दिली आहे. परंतु बँकांची कर्जवाटपाची एकंदर प्रगती पाहता आठवडाभरात पीककर्जाचे वाटप ‘बँकांसाठी’ आव्हान ठरणार आहे.
जिल्ह्यात पेरणीयोग्य असा दमदार पाऊस पडला. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतांच्या खरेदीकरिता पीककर्जाची गरज आहे. यासाठी जिल्ह्यातील २ लाख २१ हजार ४९८ खातेदारांना १६९५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे यावर्षीचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी ७०० कोटी ४६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे वाटप उद्दिष्टांच्या ४१ टक्के आहे.
जिल्हा उपनिबंधक विभागाच्या २० जूनच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५६३ कोटी २७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य आहे. सद्यस्थितीत ३८ हजार ६७ शेतकऱ्यांना ७४ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रासाठी ३१८ कोटी ३६ लाख ४९ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे वाटप उद्दिष्टांच्या ५७ टक्के इतके आहे.

प्रक्रिया शुल्क घेऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्ह्यात ४ लाख २० हजार शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ लाख २० हजार खातेदारांना म्हणजे फक्त ३० टक्के शेतकऱ्यांना बँकांनी कर्जवाटप केले आहे. ७० टक्के शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप केलेले नाही. गेल्या वर्षीच्या कर्जाची ७१ हजार शेतकऱ्यांनी परतफेड केली आहे. ३६ हजार शेतकऱ्यांचे पुनर्गठन झालेले नाही. कर्ज मंजूर करताना प्रक्रिया शुल्काची आकारणी करु नये, असे आवाहन बँकांच्या समन्वय बैठकीत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.

सेंट्रल बँकेचे ४६ टक्के,
स्टेट बँकेचे २५ टक्के वाटप
जिल्ह्यात सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ४७ शाखा आहेत. या बँकेला १८ हजार ८३३ शेतकऱ्यांना २७९ कोटी ६६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. १९ जूनपर्यंत १२७ कोटी ५८ लाख रुपयांचे वाटप या बँकेने केले आहे. ही टक्केवारी ४६ टक्के आहे.
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ५१ शाखांना ५४ हजार ३१५ शेतकऱ्यांना ३८० कोटी ९४ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्य आहे. या बँकेने १९ जूनपर्यंत १० हजार ५७७ शेतकऱ्यांना ९६ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे प्रमाण फक्त २५ टक्के इतके आहे.

Web Title: 'Challenge' to banks for allocation of crop loans in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.