-अन् केंद्रप्रमुखाने उगारला कर्मचाऱ्यांवर कोयता !
By Admin | Updated: March 15, 2016 00:30 IST2016-03-15T00:30:10+5:302016-03-15T00:30:10+5:30
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव तपासण्यासाठी आयोजित शिबिरात खुर्चीवरून उठविल्याने राग अनावर झालेल्या केंद्रप्रमुखाने कर्मचाऱ्यांच्या अंगावर कोयता उगारला.

-अन् केंद्रप्रमुखाने उगारला कर्मचाऱ्यांवर कोयता !
खुर्चीचा वाद : डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्युटमधील घटना
अमरावती : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव तपासण्यासाठी आयोजित शिबिरात खुर्चीवरून उठविल्याने राग अनावर झालेल्या केंद्रप्रमुखाने कर्मचाऱ्यांच्या अंगावर कोयता उगारला. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता स्थानिक मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या संगणक प्रयोगशाळेत घडली. गाडगेनगर पोलिसांनी आरोपी केंद्रप्रमुखाला अटक करून कोयता जप्त केला आहे.
धारणी येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत नर्सिंग इन्स्टीट्युटमध्ये ८ ते २० मार्चदरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी संगणक लॅबमध्ये सुवर्ण महोत्सवी शिष्यवृृत्ती योजनेचे प्रस्ताव तपासणीचे काम कर्मचाऱ्यांमार्फत सुरू होते.
सुरक्षिततेसाठी आणला कोयता
अमरावती : चिखलदरा तालुक्यातील हतरू येथे जि.प.शाळेतील शिक्षक तसेच प्रभारी केंद्रप्रमुख राजेश रमेश लेंडे (३६, रा. शिरजगाव बंड) हे संगणक लॅबमध्ये सकाळी ११ वाजता प्रस्ताव सादर करण्याकरिता आले होते. त्यांना प्रयोगशाळेत एक खुर्ची रिकामी दिसल्याने ते त्या खुर्चीवर बसले. मात्र, लॅबमधील कर्मचारी आर.बी.बोरकर यांनी लेंडे यांना खुर्ची मागितली. त्यामुळे लेंडे यांचा राग अनावर झाला. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. संतापाच्या भरात लेंडे यांनी बोरकर यांची कॉलर पकडली. अन्य कर्मचारीसुध्दा धाऊन आले. परंतु दरम्यान लेंडे यांनी बॅगमधून कोयता काढला आणि बोरकरसह इतर कर्मचाऱ्यांच्या अंगावर उगारला. कर्मचाऱ्यांनी त्यांना कसेबसे आवरले पकडून एका खोलीत डांबले. हा प्रकार सुरू असताना लॅबमधील अन्य पदाधिकारी भीतीपोटी लॅबमधून बाहेर निघून गेले होते. याप्रकाराबाबत कर्मचाऱ्यांनी तत्काळ गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस संगणक लॅबमध्ये पोहोचले आणि लेंडे याला ताब्यात घेतले. आर.बी.बोरकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी केंद्रप्रमुख राजेश लेंडेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हतरू येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र प्रमुख राजेश लेंडे हे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी संगणक लॅबमध्ये आले होते. हतरू ते अमरावतीदरम्यान जंगलाचा भाग असल्यामुळे बचावाच्या दृष्टीने त्यांनी बॅगमध्ये कोयता आणला होता. मात्र, लॅबमधील कर्मचाऱ्यांनी खुर्ची जबरदस्तीने हिसकावून घेतल्याने वाद निर्माण झाला आणि लॅबमधील ८ ते १० कर्मचारी मारण्यासाठी धाऊ आले. म्हणून कोयता उगारला, असे केंद्रप्रमुख राजेश लेंडे यांनी सांगितले.