शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 18:32 IST2020-12-27T18:32:46+5:302020-12-27T18:32:58+5:30
नवीन शैक्षणिक धोरणाशी राज्याने शंभर टक्के सहमत होऊ नये, संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे राज्य शासनाला आवाहन

शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी
अमरावती – नवीन शैक्षणिक धोरण हे ग्रामीण, गरीब व बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणारे आहे.नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना आयोगाने ज्या सूचना व विचार मागितले होते ते विचारात घेण्यात आले नाहीत.शिक्षण हा केंद्र व राज्य या दोन्हीच्या अधिकारातील प्रश्न असताना राज्यांना विश्वासात घेण्यात आले नाही.नवीन शैक्षणिक धोरण हे गरिबांवरील फार मोठे संकट असून या धोरणाशी राज्याने शंभर टक्के सहमत होऊ नये, अशी मागणी व आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केली.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२२ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण तर्फे आयोजित संस्थेच्या ‘शिवाजी डॉट लाईव्ह’ या युट्युब वाहिनीचा शुभारंभ, संस्थेची दैनंदिनी आणि शिवसंस्था त्रेमासिकच्या जयंती विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.गजाननराव पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव मेतकर, प्राचार्य केशवराव गावंडे, माजी न्यायाधीश अशोकराव ठुसे, सचिव शेषराव खाडे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ.वि.गो.ठाकरे, नरेशचंद्र पाटील, डॉ.अमोल महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे व डॉ. रामचंद्र शेळके हे युट्युब वाहिनीच्या माध्यमाने या कार्यक्रमात सहभागी झाले.या कार्यक्रमात वीर उत्तमराव मोहिते लिखित ‘जागतिक कृषक क्रांतीचा उद्गाता’ या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन आणि डॉ. मंदा नांदुरकर यांच्या ‘मातोश्री विमलाबाई देशमुख’ या पुस्तकाचे प्रकाशन ही करण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरण हे शैक्षणिक विकासात आडकाठी आणणारे व शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणारे आहे. आज राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये चाळीस ते पन्नास टक्के जागा रिक्त असून त्या भरल्या जात नाहीत. नव्या धोरणानुसार कमी पटसंख्या असलेल्या शाळा व महाविद्यालये रद्ध करून त्यांचा मोठ्या समूहात समावेश करायचा याचा अर्थ ग्रामीण व बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणे आहे. आजही २६ टक्के लोक शिक्षणापासून वंचित राहतात.नव्या शैक्षणिक धोरणामुळे केवळ मर्यादित लोक शिक्षण घेऊ शकतील, असेही हर्षवर्धन देशमुख म्हणाले.
हर्षवर्धन देशमुख यांनी युट्युब लाईव्ह द्वारे शिव परिवारातील सर्व सदस्यांशी व जनतेशी संवाद साधताना संस्थेच्या गेल्या वर्षभरातील कार्याचा देखील आढावा घेतला.कोरोना महामारीचा परिणाम निश्चितच शिक्षणावर झाला असला तरी संस्थेने ऑनलाईनच्या माध्यमाने जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या संगणक समितीने या संदर्भात केलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंदा नांदुरकर यांनी केले. संगणक समितीचे अध्यक्ष तथा कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी प्रास्ताविकातून युट्युब वाहिनी सुरु करण्याचा उद्देश सांगून यामुळे संस्थेतील विद्यार्थी व सर्व घटकांना जगाशी जुळण्याची संधी प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला. संस्थेचे सचिव शेषराव खाडे आणि अधीक्षक दिनेश बागल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर सचिव शेषराव खाडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सदस्य अशोकराव देशमुख, प्रभाकरराव फुसे, वीर उत्तमराव मोहिते यांच्या कन्या श्रीमती भाग्यरेखा देशमुख, प्राचार्य डॉ.संयोगिता देशमुख, प्राचार्य डॉ.शशांक देशमुख, ‘शिवसंस्था’ त्रेमासिकाचे कार्यकारी संपादक डॉ.कुमार बोबडे, संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार काही बंधने असल्यामुळे यावर्षी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नाही.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. आज सकाळी आठ वाजतापासून डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थळी भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती व त्याचे ‘शिवाजी डॉट कॉम’ या युट्युब वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व सर्व कार्यकारिणीने सकाळी ९ वाजता भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध शाळा -महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.आज दिवसभर लोकांनी स्मृतिस्थळ येथे जाऊन भाऊसाहेबांना अभिवादन केले.