कास्तकार आक्रमक
By Admin | Updated: June 6, 2017 00:02 IST2017-06-06T00:02:14+5:302017-06-06T00:02:14+5:30
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद"ला अमरावतीतून आक्रमक प्रतिसाद लाभला. तिवस्याच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी अचानक मुंबई महामार्गावर...

कास्तकार आक्रमक
यशोमतींनी रोखला राष्ट्रीय महामार्ग
काँग्रेस आक्रमक : टायर जाळले, पोलीस हतबल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद"ला अमरावतीतून आक्रमक प्रतिसाद लाभला. तिवस्याच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी अचानक मुंबई महामार्गावर कांदे फेकून दोन तास वाहतूक रोखून धरली. रस्त्यावर ठिय्या, घोषणाबाजी, टायरची जाळपोळ आणि यशोमती ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
अमरावती शहरात असलेल्या यशोमती ठाकूर अचानक रहाटगाव चौकात धडकल्या. पक्ष्यांचे थवे यावे तसे चोहिकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे थवे तेथे प्रकटले. गनिमिकाव्याने आणलेले कांदे रस्त्यावर फेकले गेले. मानवी साखळी तयार झाली. नागपूर ते मुंबई हा चौपदरी महामार्ग दोन्ही दिशांनी रोखला गेला. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सारे घडून गेल्यावर पोलिसांना संदेश पोहचू लागले. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा वाढू लागल्यावर आंदोलनस्थळी पोलिसांची गर्दी वाढू लागली. अधिकाऱ्यांची वाहने, लॉरीज्, कमांडोज, सशस्त्र दल, अग्निशमन दालाचा बंब दाखल झाले. पोलीस जसजशी त्यांची तयारी प्रभावीपणे करीत होते, तसतशी आंदोलनाची तीव्रताही वाढत होती. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचा टायर आणला. पेट्रोलची व्यवस्था झाली. पोलिसांदेखत तो जाळलाही गेला. शासनविरोधी आणि कास्तकार समर्थनार्थ गगनभेदी घोषणा झाल्यात. भर उन्हात, जळत्या टायरशेजारी रस्त्यावर ठिय्या दिला गेला. रुग्णवाहिकांना तितकी सूट देण्यात आली होती. पोलीस संख्येने भक्कम असले तरी आंदोलनाची तीव्रता आणि मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात बळीराजासाठीचा ओलावा यामुळे बळाचा वापर करण्यात आला नाही. या आंदोलनात महिलांनी दखलनीय सहभाग नोंदविला.
आंदोलनात आ.यशोमती ठाकूर, शिल्पा महल्ले, ज्योती ठाकरे, हरिभाऊ मोहोड, जि.प. सभापती जयंत देशमुख, सदस्य गजानन राठोड, अभिजित बोके, मनोज देशमुख, रितेश पांडव, नरेंद्र मकेश्र्वर, मुकदर खॉ पठाण, सागर देशमुख, संकेत बोके, मनोज टेकाडे, संजय कळसकर, राजू निर्मळ, विठ्ठल मोहोड, संजय मोहोकार, सागर यादव, शिरीष मुंदे, आशिष यादव, वैभव वानखडेसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
आमहत्याचे सत्र सुरूच आहे. शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट कर्जमाफी द्यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. इतर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी काँग्रेस पक्षाची आहे.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा
आप, प्रहार
कार्यकर्ते स्थानबद्ध
अमरावती : शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून भाजप सरकारविरोधी प्रदर्शन करणाऱ्या आप व प्रहारच्या कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी स्थानबद्ध केले. कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली.
सोमवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यामध्ये आम आदमी पार्र्टी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यापारी प्रतिष्ठाने जबरीने बंद करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सरकारविरोधी घोषणा करीत निदर्शने केली जात असताना कोतवाली पोलिसांनी २० ते २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना ठाण्यात नेले. यामध्ये आम आदमी पार्टीचे अलिम पटेल, रोशन अर्डक, रंजना मामर्डे, रितेश तिवारी, प्रवीण काकड, गोपाल रिठे, प्रदीप चौधरी, प्रमोद कुचे, किरण गुडधे, अजिंक्य पांडव यांच्यासह प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
शिवसेनेनेही पाडला
कापड बाजार बंद
अमरावती : शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सोमवारी शिवसेनाही रस्त्यावर उतरली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड, आशिष धर्माळे यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी १२ वाजता बिझिलॅन्ड,सिटीलॅन्ड, ड्रिमलॅण्ड ही नांदगाव पेठची सर्वात मोठी कापडाची बाजारपेठ बंद करण्यात आली.
सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा या प्रमुख मागण्या शिवसेनेने रेटून धरल्यात. कापड व्यावसायिकांनीही बाजारपेठ बंद करून शेतकरी आंदोलनाला भरघोस समर्थन दिले. आंदोलनात सेनेचे आशिष धर्माळे, अमोल तसरे, खुशाल रडके, भूषण पाटोळे, भूषण धर्माळे, प्रणय धर्माळे, अभिजित धर्माळे, कैलास भालेराव, सुभाष भालेराव, नीलेश रडके, जगन तायडे, योगेश तायडे व अन्य शिवसैनिक सहभागी झाले होते.
नमले प्रशासन !
महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी कणखर भूमिका आ.यशोमती ठाकूर यांनी घेतली. अखेर प्रशासन नमले. एसडीओ इब्राहिम चौधरी घटनास्थळी पोहोचले. आ.यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वात त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.