वाहतूक थांबवून भररस्त्यात 'रील्स' बनवणाऱ्या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:49 IST2025-04-11T11:49:11+5:302025-04-11T11:49:42+5:30

Amravati : व्हिडीओ व्हायरल झाल्याने कारवाईची झाली मागणी

Case registered against couple who stopped traffic and made 'reels' on the road | वाहतूक थांबवून भररस्त्यात 'रील्स' बनवणाऱ्या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

Case registered against couple who stopped traffic and made 'reels' on the road

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
शहरात पंचवटी चौकात वाहतूक थांबवून चक्क भररस्त्यात एका गाण्यावर व्हिडीओ कम रील्स बनविणाऱ्या महिला व पुरुषाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पंचवटी चौकात त्यावेळी कार्यरत वाहतूक अंमलदार मंगला बोडके यांनी ९ एप्रिल रोजी सायंकाळी तक्रार नोंदविली. ५ एप्रिल रोजी दुपारी २:३० च्या सुमारास पंचवटी चौकात तो व्हिडीओ बनविण्यात आला होता.


गाडगेनगर पोलिसांनी देवीदास विष्णूजी इंगोले व एका महिलेविरुद्ध वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविला. पैकी देवीदास इंगोले यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. दोघांना समजही देण्यात आली. देवीदास इंगोले यांनी पंचवटी चौकात कार्यरत अंमलदार मंगला बोडके यांना इन्स्टासाठी व्हिडीओ काढण्याकरिता परवानगी मागितली होती. 


मात्र, त्यांनी ती नाकारली. दरम्यान आपण जेवण करण्यासाठी गेलो असता, इंगोले व त्यांच्यासोबतच्या महिलेने रस्त्यावर रहदारीस अडथळा केला. सार्वजनिक ठिकाणी गाणे लावून, नृत्य करून वाहतुकीस अडथळा केल्याचे बोडके यांनी तक्रारीत म्हटले आहे.


व्हिडीओ व्हायरल झाल्याने...
देवीदास इंगोले यांनी राजापेठ बसस्थानकासह शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर रील्स केले आहेत. अगदी उत्सव, मेळ्यात त्यांनी पदलालित्य दाखविले आहे. सोबतच उड्डाणपुलाखालीदेखील याआधी त्यांनी 'सुनी जो तेरी पायल' अशा गाण्यांवर भरचौकात वाहतुकीला अडथळा करीत व्हिडीओ केले. मात्र, ते व्हिडीओ काहींपुरते मर्यादित राहिल्याने त्यांच्यावर टीका झाली नाही. मात्र, ५ एप्रिलचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना कारवाईस सामोरे जावे लागले. टिकेचा भडिमार व दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने दोघांनीही माफी मागितली आहे.

Web Title: Case registered against couple who stopped traffic and made 'reels' on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.