जिल्हा सहकारी बँकेचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:26+5:302021-06-17T04:10:26+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एका खासगी कंपनीत तब्बल ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कंपनी आणि बँकेचा ...

जिल्हा सहकारी बँकेचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एका खासगी कंपनीत तब्बल ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कंपनी आणि बँकेचा थेट व्यवहार असताना शेतकऱ्यांच्या ठेवीला चुणा लावत संबधिताना तब्बल ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्यात आल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले होते.
याप्रकरणी सोमवारी जिल्हा उपनिबंधकांच्या तक्रारीवरून बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चार कर्मचारी व शेअर मार्केटशी संबंधित सहा अशा एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. हे प्रकरण कोट्यवधींध्या घरात असल्याने पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार राहुल आठवले यांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे करणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण कागतपत्रांची तपासणी करून ते एसीपी भारत गायकवाड यांच्यामार्फत आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ ते २०२० या काळात निप्पोन कंपनीच्या म्युच्युअल फंडात तब्बल ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या व्यवहारातून बँकेला २६८ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले. ३ कोटी ३९ लाखांची दलाली कुणाच्या घशात गेली? थेट व्यवहार व संपर्क असताना दलाली कशासाठी, हा प्रश्न पोलीस चौकशीत उपस्थित झाला. या प्रकरणात शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बँकेचे प्रशासक सतीश भोसले यांनी बँकेचे ऑडिट करून घेतले होते. या ऑडिटमधून ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली गेल्याचे समोर आल्याने हे प्रकरण आर्थिक अफरातफरीशी संबंधित असल्याने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. या प्रकरणात बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे. सी. राठोड यांच्यासह ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
कोट
सदर प्रकरण हे कोट्यवधी रुपयांचे असल्याने यात अधिक तपासाच्या अनुषंगाने मंगळवारी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
- राहुल आठवले, ठाणेदार, सिटी कोतवाली