अचलपूर नगरपालिकेत रंगणार ‘अर्थ’कारण
By Admin | Updated: July 7, 2014 23:22 IST2014-07-07T23:22:14+5:302014-07-07T23:22:14+5:30
नगराध्यक्ष पदासाठी ३० जुलैच्या आत निवडणुक होणार आहे. यासाठी स्थानिक राजकीय आराखडे मांडले जात आहे. या निवडणुकीत ‘अर्थ’कारणाला विशेष महत्त्व येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अचलपूर नगरपालिकेत रंगणार ‘अर्थ’कारण
सुनील देशपांडे - अचलपूर
नगराध्यक्ष पदासाठी ३० जुलैच्या आत निवडणुक होणार आहे. यासाठी स्थानिक राजकीय आराखडे मांडले जात आहे. या निवडणुकीत ‘अर्थ’कारणाला विशेष महत्त्व येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नगराध्यक्षपदासाठी ईर्ष्येला पेटलेल्यांकडून या बिदागीमध्ये आणखी वाढ होणे शक्य आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाची नगरपालिका म्हणून अचलपूरचे नाव आहे. ही ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. यात एकूण ३८ नगरसेवक आहेत. दीड-दोन दशकांपासून अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेल्या या पालिकेच्या तिजोरीत विकास कामांसाठी ठणठणाट आहे. अर्थकारण मनासारखे झाल्याशिवाय कंत्राटदाराला काम मिळत नाही, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे अनेक कंत्राटदार कामे घेण्यास उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे कित्येक कामे अपूर्णावस्थेत आहेत.
अपूर्ण आणि प्रलंबित विकास कामे पूर्ण करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असले तरी अचलपूरच्या नगराध्यक्ष पदाचा काटेरी मुकूट मिळविण्यासाठी चार ते पाच नगरसेवकांमध्ये टोकाची स्पर्धा आहे. काही नगरसेवक किंगमेकरची भूमिका वठवीत असून त्यासाठी त्यांनी इच्छुकांकडून रसद घेतल्याची चर्चा पालिकेच्या राजकारणात चर्चिली जात आहे. उर्वरित रसद निवडणुकीच्या ४ ते ५ दिवस अगोदर मिळणार आहे.
अचलपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आतापर्यंत साम, दामाचा वापर झाला आहे. दंड, भेदाची नीती अद्यापपर्यंत आली नाही. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांनी दामाचे आयुध पाजळून ठेवले होते. दंड, भेद येथे बोथट ठरतो. सरकारने विद्यमान नगराध्यक्षांनाच सहा महिने मुदतवाढीचा पवित्रा घेतल्याने अनेक नगरसेवकांचा हीरमोड झाला होता. विरोधातील नगरसेवकांचा विरोधही तोकडा होता. काही विरोधकांनी सत्तेत सहभागी होत बरोबरी साधली.
आता २ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय मागे घेतल्याने उर्वरित अडीच वर्षांसाठी नवीन पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा करताच ‘थैल्या’ सैल सोडणे सुरू झाले आहे. जुळ्या शहरात ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्याच्या उकिरड्याचे ढीग, तुडूंब भरलेल्या नाल्या, त्यात रोगट हवामान अशी परिस्थिती आहे. पावसाअभावी सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अशा स्थितीत काही नगरसेवकांना मात्र चंगळीची स्वप्ने पडत आहेत. देवदर्शनासह मनसोक्त खरेदी आणि पुन्हा ८ ते १० लाखांची खुशाली, अशी साधारण बोलणी सुरू आहे.