अशोक आत्राम यांचा अप्पर आयुक्तांच्या खुर्चीवर कब्जा

By Admin | Updated: May 31, 2015 00:01 IST2015-05-31T00:01:23+5:302015-05-31T00:01:23+5:30

आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने गुरुवारी बदली केल्यानंतर त्यांनी या ...

Capture Ashok Atram to the chair of the Additional Commissioner | अशोक आत्राम यांचा अप्पर आयुक्तांच्या खुर्चीवर कब्जा

अशोक आत्राम यांचा अप्पर आयुक्तांच्या खुर्चीवर कब्जा

नियमित कामकाज : ‘स्टेटस्को’ च्या नावे शासन आदेश गुंडाळला
अमरावती: आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने गुरुवारी बदली केल्यानंतर त्यांनी या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी प्रशासकीय लवादाकडे धाव घेत ‘स्टेटस्को’ मिळविला. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. पंरतू आत्राम यांनी शनिवारी एटीसींच्या खुर्चीवर बसून नियमित कामकाज करुन शासन आदेशाला हरताळ फासले आहे. १० जून रोजी यासंदर्भात उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.
१६ आॅगस्ट २०१४ रोजी रुजू झालेले आदिवासी अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. ९ महिन्यातच बदली करण्यात आल्याने आत्राम यांनी शासन निर्णयाविरुद्ध ‘मॅट’ मध्ये धाव घेतली आहे. २००७ ते २०१५ या कार्यकाळात आठ ठिकाणी बदली करण्यात आल्याची बाब आत्राम यांना जिव्हारी लागली आहे. परंतु आत्राम यांची बदली करण्यात फार वेगळे कारण असल्याचे बोलले जात आहे. अशोक आत्राम यांच्या पत्नीने स्वत: आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे तक्रार देवून त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याची चर्चा शनिवारी एटीसी कार्यालयात ऐकावयास मिळाली. पत्नीने पतीच्या बदलीसाठी थेट मंत्र्याकडे अर्ज दिल्याने ही बाब आदिवासी विकास विभागाच्या सचिवांनी गांभीर्याने घेत आत्राम यांची बदली करुन सहायक उपायुक्त महादेव राघोर्ते यांच्याकडे पदभार देण्याचे आदेश काढले होते. हे अप्पर आयुक्त कार्यालय हे दोन दिवसातील झालेल्या नाट्यमय घडामोडींनी चांगलेच चर्चेत आले आहे.

आदिवासी समाजाला न्याय मिळावा, यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाची निमिर्ती केली आहे. परंतु या विभागात आदिवासींचा विकास करण्याऐवजी अधिकारी मलिदा खाण्यातच मश्गूल राहतात, अशा तक्रारी आहेत. आत्राम यांची बदली झाली असेल तर त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष अधिकारी या विभागात आले पाहिजे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु.
- प्रवीण पोटे
पालकमंत्री, अमरावती.

अशोक आत्राम यांच्यासंदर्भात फोनवरुन माहिती जाणून घेतली आहे. एटीसी कार्यालयात हल्ली सुरु असलेल्या वस्तुस्थितीची माहिती मेलद्वारे मागविली आहे. एकतर्फा पदभार स्वीकारण्यात आल्याने अप्पर आयुक्तपदी राघोर्ते हेच आहेत. आत्राम यांच्याविषयी गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. सर्व बाबी सचिवांना अवगत करण्यात आल्या आहेत.
- सु. ना. शिंदे
उपसचिव, आदिवासी विकास विभाग


बदली झाली याला विरोध नाही. परंतु कोणत्या कारणास्तव बदली केली, हे कळले पाहिजे. मी काही आदिवासी विभागात चोरी केली नाही अथवा दरोडा घातला नाही. एटीसी म्हणून माझी नियुक्ती ही प्रतिनियुक्तीवर असली तरी बदली करायची असल्यास तीन महिने अगोदर नोटीस देणे अपेक्षित आहे. पदभार सोडला नसल्याने अप्पर आयुक्तपदी कायम आहे.
- अशोक आत्राम
अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग

बदल्यांच्या फाईलींवर स्वाक्षरींची स्पर्धा
आदिवासी विकास विभागातंर्गत अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. १३ जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या एटीसी कार्यालयातून होणार आहे. बदल्यांमध्ये होणाऱ्या फिक्सींगचा मलिदा चाखण्यासाठी फाईलींवर स्वाक्षरीची स्पर्धा सुरु झाली आहे. या फाईलींवर आत्राम अथाव राघोर्ते यापैकी स्वाक्षरी कोणाची? याकडे लक्ष लागले आहे

Web Title: Capture Ashok Atram to the chair of the Additional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.