बाजारपेठेतील गर्दी थांबेना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:58+5:30

जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळेत मुभा दिली. ‘लॉकडाऊन’, संचारबंदी दरम्यान घराशेजारी भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना इतवारा बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते, किराणा दुकानात तुडंूब गर्दी होत आहे.

Can't stop the crowds in the market? | बाजारपेठेतील गर्दी थांबेना?

बाजारपेठेतील गर्दी थांबेना?

अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी, एकमेकांसोबत किमान तीन फूट अंतर सोडून संवाद साधावा, अशा प्रशासनाकडून ‘सोशल डिस्टेन्सिंग’च्या सूचना आहेत. मात्र, रविवारी सायन्सकोर मैदान, इतवारा बाजारात किराणा अथवा भाजीपाल्यासाठीची गर्दी थांबत नसल्याचे चित्र दिसून आले. इतवारा बाजारात दुकानदारांकडून प्रशासनाला सहकार्य मिळत नसल्याची ओरड आहे. जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळेत मुभा दिली. ‘लॉकडाऊन’, संचारबंदी दरम्यान घराशेजारी भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना इतवारा बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते, किराणा दुकानात तुडंूब गर्दी होत आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजेनंतर नागरिकांनी भाजीपाला, फळे खरेदीकरिता गर्दी केल्यामुळे प्रशासनाच्या ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या सूचनांना नागरिकांकडून बगल देण्यात आले. महापालिका अतिक्रमण विभाग, बाजार परवाना व पशू वैद्यक विभागाच्या पथकाला गर्दी ओसरण्यासाठी चक्क इतवारा बाजार बंद करावा लागला. दुकानदार केवळ व्यावसाय करण्यात मग्न होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होणार नाही, याचे कोणालाही घेणे-देणे नाही, असा नागरिकांचा मुक्त संचार होता. नागरिक एकत्रित येत असल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, असा अहवाल महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना फिरत्या पथकाने दिला आहे.

सायन्स्कोर मैदानावर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विसर
प्रशासनाने गर्दी होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने ठिकठिकाणी लावण्याच्या उपाययोजना केल्या आहेत. शहरात १६ ठिकाणी भाजीविक्रीची ठिकाणे निश्चित केली आहेत. येथील सायन्स्कोर मैदानावर रविवारी भाजीपाल्यासाठी गर्दी उसळली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टेन्सिंग’च्या सूचना असताना नागरिकांना याचा विसर पडला होता.

इतवाराबाजारात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पार्किंग लांब ठेवण्यात येणार आहे. नेहरू मैदानावर भाजीपाला विक्री सुरू करण्यात येणार आहे. इतवाराबाजार गर्दी रोखण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात येतील.
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

Web Title: Can't stop the crowds in the market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.